मलकापूर: सहा वर्षांपासून बेपत्ता असलेल्या पतीचा शोध घेण्यासाठी पत्नीची पोलिसांत धाव तक्रार

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): कौटुंबिक वादातून घर सोडून गेलेले पती सहा वर्षांनंतरही परत न आल्याने, अखेर एका हतबल पत्नीने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. विनोद तुळशीराम बावणे (वय ५० वर्षे) रा. कुंड खुर्द असे बेपत्ता व्यक्तीचे नाव असून, पोलिसांनी याप्रकरणी मिसिंग दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी छाया विनोद बावणे (वय ३८ वर्षे) सध्या रा. भारत नगर (वाशी नाका, चेंबूर, मुंबई) आणि त्यांचे पती विनोद बावणे यांच्यात ३ जून २०२० रोजी किरकोळ घरगुती कारणावरून वाद झाला होता. हा वाद अधिक वाढू नये आणि घरातील शांतता टिकून राहावी, या उद्देशाने छाया बावणे या आपल्या माहेरी निघून गेल्या होत्या. काही काळानंतर त्या पुन्हा आपल्या सासरी म्हणजे कुंड खुर्द येथे परतल्या, मात्र त्यांचे पती विनोद हे घरी मिळून आले नाहीत. पती घरी नसल्याचे पाहून छाया बावणे यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीच पत्ता लागला नाही. दरम्यान, छाया बावणे यांनी मुंबईतील कुर्ला न्यायालय (कोर्ट नं. ५२) येथे पतीविरुद्ध सीसी १५९ अंतर्गत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने विनोद बावणे यांच्या नावे समन्स आणि वॉरंट देखील बजावले होते. मात्र, पोलीस तपास आणि नातेवाइकांकडील चौकशीतही त्यांचा शोध लागला नाही. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि सर्व प्रयत्न थकल्यानंतर, छाया बावणे यांनी मलकापूर शहर पोलीस गाठून पती बेपत्ता असल्याची रीतसर तक्रार दिली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी मिसिंग दाखल केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार सचिन पाटील हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!