अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): न्यायालयात सुरू असलेली जुनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकून एका महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दाताळा येथे घडली आहे. आरोपीने केवळ अश्लील शिवीगाळच केली नाही, तर भररस्त्यात नग्न होऊन पीडितेचा विनयभंग केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
दाताळा येथील कोळीवाडा भागात राहणाऱ्या ३६ वर्षीय जनाबाई (नाव बदललेले) या आपल्या पतीसह घरी असताना ही घटना घडली. ६ मे २०२६ रोजी सकाळी ११.१५ च्या सुमारास आरोपी चंद्रकांत उत्तम सपकाळ (रा. दाताळा) हा फिर्यादीच्या घरासमोरील रस्त्यावर आला. आरोपी चंद्रकांत याने विनाकारण फिर्यादीच्या घराकडे पाहून जोरजोरात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ का करतो, हे विचारण्यासाठी जेव्हा फिर्यादी आणि तिचे पती आरोपीजवळ गेले, तेव्हा वादाचे खरे कारण समोर आले. आरोपीचा भाचा शुभम संजय कांडेलकर याच्याविरुद्ध फिर्यादीने यापूर्वी पोलिसांत रिपोर्ट दिला होता. हाच जुना राग मनात धरून आरोपी चंद्रकांत याने दमदाटी सुरू केली. तुम्हाला माझ्या भाच्याविरुद्धचा रिपोर्ट मागे घ्यायचा की नाही?, असा सवाल त्याने केला. त्यावर फिर्यादी दांपत्याने आम्ही रिपोर्ट मागे घेणार नाही, असे ठामपणे सांगितले. फिर्यादीने नकार देताच आरोपीचा संयम सुटला. त्याने भररस्त्यात फिर्यादी महिलेसमोर आपली पॅन्ट खाली करून अत्यंत अश्लील चाळे केले. पीडितेचा विनयभंग करत त्याने अत्यंत खालच्या थराची भाषा वापरत अश्लील शिवीगाळ केली. फिर्यादीच्या पतीने या प्रकाराला विरोध केला आणि आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने त्यांनाही सोडले नाही. तुम्हाला एका दिवशी जिवाने ठार मारील आणि तुमच्याविरुद्धच खोटे गुन्हे दाखल करील, अशी धमकी दिली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
भरदुपारी घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेने तातडीने मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चंद्रकांत उत्तम सपकाळ विरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ७९, २९६, ३५२, ३५१ (२), (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार बाळू टाकरखेडे हे करीत आहेत. भरवस्तीत एका महिलेसोबत घडलेल्या या प्रकारामुळे दाताळा परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जुन्या वादातून एखाद्या महिलेचा अशा प्रकारे विनयभंग करणे हे विकृत मानसिकतेचे लक्षण असून, अशा गुंडांवर पोलिसांनी कडक जरब बसवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
