खाकीचा धाक संपला की चोरट्यांचे ‘अच्छे दिन’ आले? नांदुऱ्यात भरवस्तीत १७ लाखांवर डल्ला!

अजय टप

नांदुरा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):एकीकडे पोलीस प्रशासन ‘आम्ही सदैव आपल्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य मिरवत असताना, दुसरीकडे चोरट्यांनी पोलिसांच्या या दाव्याचे पुरते वाभाडे काढले आहेत. नांदुरा खुर्द येथील पंचवटी परिसरात एका सेवानिवृत्त वृद्धाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १७ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, नांदुऱ्यात सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का?, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

नांदुरा खुर्द येथील रहिवासी असलेले शेख मुस्ताक शेख रज्जक (वय ६४ वर्षे) हे आपल्या मुलासह मलकापूर येथे नातवाच्या साखरपुड्याच्या (मंगणी) कार्यक्रमासाठी गेले होते. घरी आनंदाचे वातावरण होते, पण याच आनंदावर विरजण घालण्यासाठी चोरटे दबा धरून बसले होते. दिनांक ५ मे च्या रात्री १० वाजेपासून ते ६ मे च्या संध्याकाळी ६ वाजेपर्यंत, म्हणजेच भरदिवसा आणि रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी आपले कसब दाखवले. शेख कुटुंब घरी परतले, तेव्हा त्यांना घराच्या वरच्या मजल्याचे कुलूप तुटलेले दिसले. आत गेल्यावर घरातील चित्र पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. लोखंडी कपाटाचे लॉकर उचकटून चोरट्यांनी शेती व्यवहाराचे १५ लाख, व्यापाराचे नगदी १ लाख ५० हजार रुपये, सोन्याचे दागिने ५०,००० रुपये (१० ग्रॅम वजन), असा एकूण १७ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शेख मुस्ताक यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसांत भारतीय न्याय संहिताचे कलम ३३१ (३), ३३१ (४) आणि ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी चौधरी हे करीत आहेत.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

ही घटना म्हणजे नांदुरा पोलिसांच्या गस्तीवर आणि गुप्तचर यंत्रणेवर ओढलेले ताशेरे आहेत. १७ लाख रुपये रोख रक्कम घरात असणे आणि त्याची कुणकुण चोरट्यांना लागणे, हे साधे चोरीचे प्रकरण नसून यामागे मोठी टोळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, चोरट्यांनी ज्या धैर्याने हे कृत्य केले, त्यावरून त्यांना ‘खाकी’ची भीती उरली नाही का?, असा खोचक प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर जर अशी धाडसी घरफोडी होत असेल, तर चोरांना पोलिसांचे अभय आहे की पोलिसांचा वचक संपला आहे?, अशा संतप्त प्रतिक्रिया पंचवटी भागातील रहिवाशांकडून उमटत आहेत.

आता तरी खाकी जागी होणार का?

नांदुरा तालुक्यात गुन्हेगारीने डोके वर काढले असून, घरफोडीच्या घटनांनी उच्चांक गाठला आहे. १७ लाखांची ही घरफोडी पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगणारी ठरली आहे. सपोनी चौधरी साहेब या प्रकरणाचा छडा लावून चोरट्यांना बेड्या ठोकणार की ही फाईलही इतर प्रकरणांप्रमाणे धूळ खात पडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन नांदुऱ्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था रुळावर आणावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, जनतेचा पोलिसांवरील उरलासुरला विश्वासही उडायला वेळ लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!