मलकापूर ग्रामीणमध्ये महावितरणला मोठा फटका; अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या हजारो मीटर तारा, पोलही पाडले!

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत महावितरणच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या एका अज्ञात टोळीने धुमाकूळ घातला आहे. जंभुळधाबा आणि खामखेड शिवार परिसरातून महावितरणच्या हजारो मीटर विद्युत तारांची चोरी झाली असून, यामध्ये कंपनीचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी केवळ ताराच चोरल्या नाहीत, तर सिमेंटचे पोल तोडून महावितरणच्या यंत्रणेचे मोठे नुकसान केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. पहिली घटना १८ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ च्या दरम्यान घडली. जंभुळधाबा आणि खामखेड शिवारातील जलालाबाद जुनी १०० KVA DTC (कोड ४२८८२५०) या ट्रान्सफॉर्मरवरील ३ फेज फोर वायरच्या तब्बल ५७६० मीटर तारा अज्ञात चोरट्यांनी कापून नेल्या. त्यानंतर, २० एप्रिलच्या रात्री ठोसे डी.पी. ६३ केव्हीए (कोड २८८१०१७) या ठिकाणच्याही २४ गाळ्यांमधील ५७६० मीटर तारांची चोरी झाली. अशाप्रकारे एकूण ४८ गाळ्यांमधील ११,५२० मीटर लांबीच्या तारा चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

महावितरणचे ५९ हजारांचे नुकसान

या चोरीमुळे महावितरण कंपनीचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. चोरीला गेलेल्या तारांची किंमत आणि चोरट्यांनी २ पीएससी (PSC) पोल तोडल्यामुळे झालेले नुकसान मिळून एकूण ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या नुकसानीमुळे परिसरातील वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला असून शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकरणी महावितरणचे कनिष्ठ अभियंता (प्रभारी) मंगेश राणे यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस अंमलदार सविता मोरे ह्या करीत आहेत. ग्रामीण भागात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी धास्तावले असून, पोलिसांनी या अज्ञात चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!