अजय टप
धामणगाव बढे,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एमएससीआयटी (MS-CIT) क्लासला गेलेली १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी संशयास्पद रित्या बेपत्ता झाली असून, तिला अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
धामणगाव बढे येथील वॉर्ड क्र. १, धनगर वाडा येथील रहिवासी गजमल लक्ष्मण वाघ (वय ७० वर्ष) यांची नात कु. जिज्ञासा कैलास वाघ (वय १५ वर्षे ९ महिने १० दिवस) ही बुधवार, ६ मे २०२६ रोजी नेहमीप्रमाणे दुपारी ३ वाजेच्या सुमारास एमएससीआयटी क्लासला गेली होती. क्लास संपल्यानंतर ती बाहेर पडली, मात्र संध्याकाळ होऊनही ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी सुरुवातीला ती मैत्रिणीकडे किंवा जवळच्या नातेवाईकांकडे गेली असावी या समजुतीने तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. परिसरात आणि नातेवाईकांकडे विचारपूस करूनही मुलगी मिळून न आल्याने अखेर आजोबा गजमल वाघ यांनी धामणगाव बढे पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून धामणगाव बढे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार सुरेश सोनवणे हे करीत आहेत.
