शेगावातून गाभण गायीची चोरी; माळीपुरा परिसरातून अज्ञात चोरट्याने साधला डल्ला

अजय टप
शेगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव शहरात आता चोरट्यांनी आपला मोर्चा पाळीव जनावरांकडे वळवला आहे. शहरालगत असलेल्या माळीपुरा गेट क्रमांक २८ परिसरातील एका शेतकऱ्याची गाभण गाय अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास लंपास केली. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माळीपुरा गेट क्रमांक २८ येथील रहिवासी विठ्ठल नामदेव शेगोकार (वय ७६ वर्षे) हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे एक लाल रंगाची, ४ वर्षे वयाची गाभण गाय होती. नेहमीप्रमाणे मंगळवार, ५ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांनी गायीला चारा-पाणी देऊन घरासमोरील गोठ्यात सुरक्षितपणे बांधले होते.
मध्यरात्री २.४५ वाजेच्या सुमारास फिर्यादी विठ्ठल शेगोकार हे लघुशंकेसाठी उठले असता, त्यांनी गोठ्यात डोकावून पाहिले. त्यावेळी त्यांची लाल रंगाची गाय गोठ्यात सुखरूप बांधलेली होती. मात्र, पहाटे ५ वाजेच्या सुमारास जेव्हा त्यांचा मुलगा संदीप हा उठला, तेव्हा त्याला गोठ्यातील गाय दिसून आली नाही. त्याने तात्काळ ही बाब वडिलांच्या निदर्शनास आणून दिली. गायीची चोरी झाल्याचे लक्षात येताच शेगोकार कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात, शेतात आणि ओळखीच्या ठिकाणी विचारपूस केली. मात्र, कोठेही गायीचा पत्ता लागला नाही. अखेर आपली १०,००० रुपये किमतीची गाभण गाय कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची खात्री पटल्यानंतर, विठ्ठल शेगोकार यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.
याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पुढील तपास रवी इंगळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!