बुलढाणा जिल्ह्यात चिंतेचे सावट: २४ तासांत चार व्यक्ती बेपत्ता; एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची शंका

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात हरवलेल्या आणि बेपत्ता होणाऱ्या व्यक्तींच्या प्रमाणात अचानक वाढ झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या २४ तासांत नांदुरा, मलकापूर आणि तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण चार बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यात तीन विवाहित महिला आणि एका १७ वर्षीय मुलाचा समावेश असून, मुलाच्या बाबतीत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलकापूर: ‘भाजीपाला आणते’ म्हणून गेली ती परतलीच नाही

मलकापूर एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत नरवेल येथील रहिवासी मुक्ता लक्ष्मण घुगरे (वय ३६ वर्षे) या ७ मे २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बेपत्ता झाल्या आहेत. मुक्ता यांनी पती लक्ष्मण घुगरे यांना मी कपडे आणि भाजीपाला आणण्यासाठी माहेश्वरी ड्रेसेस, मलकापूर येथे जाते, असे सांगून घर सोडले. त्यांनी नरवेल बस स्टॉपवरून मलकापूरकडे जाणारी बस पकडली. त्यांचा रंग सावळा, सडपातळ शरीरयष्टी, लाल रंगाची साडी आणि ब्लाउज. गळ्यात मंगळसूत्र आणि पायात लाल सँडल. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःचा मोबाईल घरीच ठेवला होता. पुढील तपास पोलीस अंमलदार राजेश बावणे हे करीत आहेत.

तामगाव: संग्रामपूरचा राज शिर्के वरवट बकाल येथून संशयास्पद बेपत्ता

तामगाव पोलीस स्टेशनमध्ये एका गंभीर प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. १७ वर्ष ९ महिने वयाचा **राज सुरेश शिर्के हा ५ मे पासून बेपत्ता आहे. राज हा वरवट बकाल येथून आपल्या गावी (संग्रामपूर) येतो असे म्हणून निघाला, मात्र तो घरी पोहोचला नाही. फिर्यादी छाया सुरेश शिर्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून, राजला कुणीतरी कायदेशीर पालकत्वातून पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी तामगाव पोलिसांत भारतीय न्याय संहिताच्या कलम १३७(२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार उमेश बोरसे हे करत आहेत. त्याचा रंग निमगोरा असून त्याने अंगात पांढरा शर्ट, निळी पॅन्ट घातलेली आहे. त्याच्या डाव्या हातावर ब्लेडने कापल्याचे निशाण आहे.

नांदुरा: कामावर जाते म्हणून निघालेली विवाहिता बेपत्ता

नांदुरा शहरातील वार्ड क्रमांक १४ मधील पंचफुला लक्ष्मण आसुलकर (वय ५० वर्षे) या ८ मे रोजी सकाळी ८ वाजेपासून बेपत्ता आहेत. पंचफुला या रोजच्याप्रमाणे भंगाराच्या दुकानात मजुरीसाठी निघाल्या होत्या. मात्र, त्यांच्या सहकाऱ्याने घरी फोन करून त्या कामावर आल्या नसल्याचे कळवल्याने खळबळ उडाली. पंचफुलाची उंची ५ फूट असून तिचा रंग गोरा आहे. तसेच तिने हिरव्या रंगाची साडी आणि लाल रंगाची स्लिपर घातलेली आहे. पुढील तपास संदीप सोळंके हे करीत आहे.

नांदुरा: घरातून अचानक पत्नी गायब

नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गतच दुसरी घटना ७ मे रोजी समोर आली. कल्याणी दिलीप डाबेराव (वय २७ वर्षे) या त्यांच्या घरातून अचानक निघून गेल्या आहेत. पती दिलीप डाबेराव कामावरून घरी आले असता त्यांना पत्नी घरात दिसली नाही. रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि नातेवाईकांकडे शोध घेऊनही काहीही पत्ता लागला नाही. त्यांचा रंग सावळा असून त्यांनी हिरवी साडी, गोल्डन ब्लाउज घातलेले आहे. विशेष म्हणजे त्या अनवाणी (पायात चप्पल नसताना) घरून निघून गेल्या आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार सैय्यद करत आहेत.

एकाच दिवसात अशा प्रकारे चार व्यक्ती (विशेषतः महिला आणि बालक) बेपत्ता झाल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. उन्हाळी सुट्ट्या आणि गर्दीच्या काळात अशा घटना घडत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या व्यक्तींबाबत काहीही माहिती मिळाल्यास कृपया संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!