अजय टप
शेगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव शहरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, शुक्रवारी ७ मे २०२६ रोजी स्थानिक पोलिसांनी एका मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी वरली मटक्याचा खेळ खेळणाऱ्या ९ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून नगदी रोकड आणि मोबाईलसह एकूण ८७ हजार ९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक (बुलढाणा) अमोल गायकवाड आणि अप्पर पोलीस अधीक्षक (खामगाव) श्रेणिक लोढा यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे मुळासकट उपटून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, अनुपकुमार मेहेर, विजय वारुळे आणि सतिश नाटेकर यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वरली मटका आणि जुगार सुरू असल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पथकाने सापळा रचून जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला असता, तिथे मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी जमली होती. पोलिसांनी घेराव घालून एकूण ९ आरोपींना जागीच अटक केली. या कारवाईत पोलिसांनी खालील २९ हजार ९०० रुपये रोख, मोबाईल संच ९ नग, वरली मटका लिहिण्याचे साहित्य व जुगाराची साधने, असा ८७ हजार ९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेगाव शहर पोलीस करीत आहेत. या कारवाईमुळे वरली मटका आणि जुगार चालवणाऱ्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
