बुलढाणा जिल्ह्यात चिंतेचे वातावरण: नांदुरा आणि धाड परिसरातून विवाहित महिला व दोन मुली बेपत्ता; पोलीस तपासात गती

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज पोर्टल):बुलढाणा जिल्ह्यातून बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच असून, गेल्या २४ तासांत नांदुरा आणि धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक तरुण मुलगी, एक विवाहित महिला आणि १० वर्षांची चिमुकली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांत नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ‘मिसींग’ची नोंद केली आहे.

नांदुऱ्यातील लोणवडी येथील १८ तरुणी बेपत्ता

नांदुरा तालुक्यातील लोणवडी येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी नांदुरा पोलिसांत फिर्याद दिली आहे. दिनांक ११ मे २०२६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तरुणीचे वडील घरगुती बाजार करण्यासाठी नांदुरा येथे गेले होते. त्यावेळी तरुणी घरात एकटीच होती. दुपारी ४ वाजता बाजार करून ते घरी परतले असता, त्यांना मुलगी घरात दिसून आली नाही. त्यांनी तात्काळ शेजारी, संपूर्ण गाव आणि नातेवाईकांकडे विचारपूस केली, मात्र तिचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर रात्री उशिरा ११.२८ वाजता नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशन प्रभारी यांच्या आदेशानुसार पोलीस अंमलदार सोळंके करत आहेत.

धाड परिसरातून आई आणि १० वर्षांची मुलगी बेपत्ता

दुसरी धक्कादायक घटना धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जांब गावातून समोर आली आहे. संभाजीनगरला जाण्यासाठी निघालेली २८ वर्षीय विवाहित महिला आणि त्यांची १० वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी पतीने दिलेल्या माहितीनुसार, १० मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास महिला आणि मुलगी या उपचारासाठी जांब येथून संभाजीनगरकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. महिलेच्या सासूने त्यांना जांब येथून बसमध्ये व्यवस्थित बसवून दिले होते. मात्र, रात्री १० वाजेपर्यंत त्या संभाजीनगर येथील घरी पोहोचल्या नाहीत. पतीने सर्व नातेवाईकांकडे आणि परिचित ठिकाणी शोध घेतला, परंतु दोघींचाही पत्ता न लागल्याने ११ मे रोजी दुपारी ३.१५ वाजता धाड पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार सुनील सोनुने हे करत आहेत. एकाच जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, पोलीस या दोन्ही प्रकरणांचा तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!