धक्कादायक! मलकापुरात अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार; चाकूचा धाक दाखवून वारंवार केले शोषण

अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दाताळा परिसरातून समोर आली आहे. घराचे बांधकाम सुरू असताना ओळख निर्माण करून, एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह त्याला साथ देणाऱ्या एकूण तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत मुलगी (वय १६ वर्ष १० महिने) ही दाताळा येथे वास्तव्यास असून ती ८ वी मध्ये शिक्षण घेत आहे. सन २०२५ मध्ये पिडीतेच्या घराचे बांधकाम सुरू होते. या कामादरम्यान आरोपी तोफीख शाह अताउल्हा शाह उर्फ शाहरुख (रा. पारपेठ, मलकापूर) हा वारंवार पिडीतेच्या घरी येत असे. याच काळात त्याची पिडीत मुलीशी ओळख झाली. डिसेंबर २०२५ मध्ये पिडीतेचे आई-वडील घरी नसताना ती घराबाहेर उभी होती. यावेळी आरोपी तोफीख शाह अताउल्हा शाह, मुज्जु शाह साबीर शाह आणि शाकीर शाह हे तिघे तिथे आले. मुज्जु आणि शाकीर हे घराबाहेर पाळत ठेवून उभे राहिले, तर मुख्य आरोपी तोफीख याने पिडीतेचा हात धरून तिला बळजबरीने ओढत घराच्या आत नेले. तिथे त्याने पिडीतेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला.
कुटुंबाला संपवण्याची धमकी
अत्याचार केल्यानंतर नराधम तोफीख इथेच थांबला नाही. त्याने पिडीतेच्या गळ्याला चाकू लावून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. जर हा प्रकार तुझ्या आई-वडिलांना किंवा भावाला सांगितला, तर त्यांना एखाद्या दिवशी जिवाने मारून टाकीन, अशी भीती घातल्यामुळे पिडीत मुलगी प्रचंड दहशतीत होती. याच भीतीचा फायदा घेत जानेवारी २०२६ मध्येही आरोपीने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात आरोपीने वारंवार तिचे शारीरिक शोषण केले. सततच्या जाचाला आणि दहशतीला कंटाळून अखेर पिडीतेने हिंमत एकवटून ११ मे २०२५ रोजी सायंकाळी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले आणि आपबिती सांगितली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तोफीख शाह अताउल्हा शाह उर्फ शाहरुख (रा.पारपेठ, मलकापूर), मुज्जु शाह साबीर शाह (रा.बुलडाणा, ह.मु. पारपेठ, मलकापूर), शाकीर शाह (रा.मुस्ताकअली नगर, मलकापूर) याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ६४(१), ६४(२)(ड), ७०(२), ३५१(२)(३), ३(५) आणि पोक्सो कायदा कलम ४, ६, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड हे करत आहेत. या घटनेमुळे दाताळा परिसरात संतापाची लाट उसळली असून, नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!