अजय टप
शेगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव शहरात एका नराधमाने माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडवली आहे. लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका २७ वर्षीय तरुणीवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी कार्तिक स्वामी वानखडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खामगाव येथील गोपाळनगर परिसरातील रहिवासी असलेली २७ वर्षीय पीडित तरुणी मजुरी करून आपले पोट भरते. आरोपी कार्तिक स्वामी वानखडे (वय २८ वर्षे) रा. घाटपुरी बायपास, पंजाब ले-आउट, खामगाव याने या तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले. मी तुझ्याशी लग्न करेन, असे खोटे आश्वासन देऊन त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला.
या विश्वासाचा फायदा घेत नराधम कार्तिकने २३ नोव्हेंबर २०२५ रोजी पीडितेला शेगाव येथील एका लॉजवर नेले. तिथे लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध पहिल्यांदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा अत्याचाराचा सिलसिला इथेच थांबला नाही; त्यानंतरही दोन-तीन वेळा त्याने तिला विविध लॉजवर नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. ४ मे २०२६ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास आरोपीने पीडितेला फोन करून आपल्या घरी बोलावले. तिथेही मी तुझ्याशी नक्की लग्न करेन, असे म्हणत त्याने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. मात्र, जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा आरोपीने लग्नास स्पष्ट नकार दिला आणि टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलीस स्टेशन गाठले.
पीडितेच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ६९, ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम ३(१)(w)(i)(ii), ३(२)(v) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास खामगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे करीत आहे.
समाजात संतापाची लाट
लग्नाचे आमिष दाखवून एका गरीब मजूर तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नराधमावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. समाजातील वंचित घटकातील महिलेवर झालेल्या या अत्याचारामुळे दलित संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, पीडितेला न्याय मिळेपर्यंत लढा देण्याचा इशारा दिला आहे.
