बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारांचे ‘अच्छे दिन’; पोलिसांचा धाक ओसरला, चोरट्यांचा सुळसुळाट!; खाकीचा वचक संपला की चोरांचे धाडस वाढले? एकाच दिवसात चार मोठ्या चोऱ्यांनी जिल्हा हादरला; शेगाव ते मोताळा पोलीस फक्त ‘डायरी’ लिहिण्यात मग्न!

अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात सध्या कडाक्याच्या उन्हापेक्षाही चोरीच्या घटनांची धग सर्वसामान्यांना जास्त सोसावी लागत आहे. पोलीस प्रशासन सदैव आपल्या सेवेसाठी, हे ब्रीदवाक्य आता फक्त पोलीस ठाण्याच्या भिंतीवरच शोभून दिसत असून, प्रत्यक्षात चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून धुमाकूळ घातला आहे. शेगाव शहर आणि बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच दिवसात झालेल्या चार मोठ्या चोऱ्यांनी जिल्ह्याच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत. घरात घुसून कपाट फोडणे काय किंवा धावत्या बसमध्ये दागिने लंपास करणे काय, चोरट्यांसाठी आता ‘कायद्याचे राज्य’ राहिले नसून ‘चोरांचे राज्य’ सुरू झाले आहे की काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
शेगावात ७७ वर्षीय वृद्धेच्या घरात दिवसाढवळ्या डल्ला!
पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव शहरात आता भाविकच काय, तर स्थानिक नागरिकही सुरक्षित राहिलेले नाहीत. सावता चौक भागातील रहिवासी शंकुतला सुखदेव असोलकर (वय ७७ वर्षे) या वृद्ध महिलेच्या घरात अज्ञात चोरट्याने भरदिवसा प्रवेश केला. फिर्यादी महिला फिजिओथेरपीसाठी हॉस्पिटलमध्ये गेल्याची संधी साधत चोरट्याने कपाटाचे लॉकर उघडून तब्बल २० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. धक्कादायक म्हणजे, चोरट्याने घराच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून कपाटाची चावी शोधून चोरी केली. भरवस्तीत दिवसाढवळ्या होणाऱ्या या चोरीने शेगाव पोलिसांच्या गस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
धावत्या बसमध्ये ‘स्त्रीधना’वर डल्ला; मोताळा बसस्थानकावरील सुरक्षा रामभरोसे!
दुसरी घटना मोताळा बसस्टॉपवर घडली, जिथे प्रवाशांच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सौ. कल्पना दिनेश इंगळे या महिला प्रवाशाच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने त्यांचे लग्नातील ‘स्त्रीधन’ असलेले सोन्याचे दागिने अत्यंत शिताफीने चोरले. मलकापूर ते छत्रपती संभाजीनगर बसमध्ये बसत असताना हा प्रकार घडला. सुमारे २३ हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली. बसस्थानकावर पोलिसांची उपस्थिती केवळ नावापुरतीच असल्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरटे मोकळे रान शोधत आहेत.
राजूरमध्ये किराणा दुकान फोडले; चोरट्यांची नजर आता बदामावर!
बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजूर येथे तर चोरट्यांनी चक्क किराणा दुकानही सोडले नाही. इस्माईल खान सरफराज खान यांच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ किलो बदाम आणि गल्ल्यातील चिल्लर असा २ हजार ७५० रुपयांचा माल चोरला. ही रक्कम लहान असली तरी चोरट्यांची हिंमत किती वाढली आहे, हे यावरून दिसून येते. मुख्य रस्त्यावरील दुकाने जर सुरक्षित नसतील, तर ग्रामीण भागातील जनतेने कुणाकडे पाहायचे?
इब्राहिमपूरमध्ये अडीच लाखांची रोख रक्कम लंपास; कष्टकऱ्यांच्या घामाचा पैसा गेला!
सर्वात मोठी आणि खळबळजनक चोरी इब्राहिमपूर (ता. मोताळा) येथे घडली. अनिल सावजी श्रीनाथ हे शेतकरी बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मका आणि गहू विकून साठवलेली कष्टाची २ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. शेतकऱ्याने रक्ताचे पाणी करून कमावलेला पैसा एका रात्रीत लंपास होतो, पण पोलिसांना याचा साधा सुगावा लागत नाही, हे पोलीस प्रशासनाचे मोठे अपयश मानले जात आहे.
पोलिस फक्त ‘तारीख’ पे तारीख देण्यात मग्न?
या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे ‘आरोपी अज्ञात’. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होतात, कलमे लावली जातात, पण आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलीस कुचकामी ठरत आहेत. रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गाड्यांचे सायरन फक्त मुख्य रस्त्यावरच का वाजतात? गल्लीबोळात चोरटे उच्छाद मांडत असताना पोलीस झोपलेले असतात का?, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
खाकीची भीती संपली!
जिल्ह्यातील या चोऱ्यांची मालिका पाहता, गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरलेला नाही हे स्पष्ट होते. चोरटे आता केवळ रात्रीच नव्हे, तर दिवसाही घरफोड्या करत आहेत. पोलिसांचे गुप्तहेर खाते नेमके काय करत आहे? जर सामान्य नागरिकांच्या कष्टाची कमाई आणि स्त्रीधन सुरक्षित नसेल, तर या पोलीस प्रशासनाचा उपयोग काय? आता वेळ आली आहे की जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून ‘फिल्डवर’ न दिसणाऱ्या पोलिसांना कामाला लावावे. अन्यथा, “पोलीस आमचे मित्र” ऐवजी “चोरट्यांचे पोलीस मित्र”, अशी म्हण प्रचलित व्हायला वेळ लागणार नाही, एवढे मात्र खरे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!