अजय टप
बोराखेडी,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील अंत्री येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. भरवस्तीत आणि घरात सुरक्षित झोपलेल्या एका ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना १५ मे रोजी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील ३९ वर्षीय फिर्यादी ह्या दि. १५ मे च्या रात्री आपल्या घरात गाढ झोपेत होत्या. उन्हाळ्याचे दिवस असल्याने घराचे दार उघडे होते, याच संधीचा फायदा घेत गावातीलच गजानन जयराम हरमकार या नराधमाने रात्री दीड वाजेच्या सुमारास घरात बेकायदेशीर प्रवेश केला. झोपलेल्या फिर्यादीजवळ जाऊन आरोपीने लज्जास्पद हेतूने त्यांचा उजवा हात पकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे फिर्यादीला जाग आली आणि त्यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड सुरू केली. महिलेच्या आवाजाने शेजारी जागे होतील या भीतीने नराधम गजानन हरमकार याने तिथून पळ काढला. पळून जाताना त्याने फिर्यादीला अत्यंत अश्लील शिवीगाळ करत जर कोणाला काही सांगितले तर जीवाने मारून टाकीन, अशी धमकी दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पीडित महिलेने तातडीने बोराखेडी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली. पहाटे ५ वाजेच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत उपरोक्त आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ३३३, ३५२, ३५१(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार अमोल खराडे हे करत आहेत.
आरोपीला बेड्या ठोकण्याची मागणी
अंत्री सारख्या शांत गावात अशा प्रकारे घरात शिरून विनयभंग झाल्यामुळे महिला वर्गात दहशतीचे वातावरण आहे. आरोपी गजानन हरमकार याने केवळ विनयभंगच केला नाही, तर जीवे मारण्याची धमकी देऊन कायद्याला आव्हान दिले आहे. अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावे, अशी मागणी आता ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.
