अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा तालुक्यातील रायपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैलानी येथे एका लग्नकार्यात कौटुंबिक वादातून विवाहितेला जाहीरपणे शिवीगाळ करत ‘त्रिवार तलाक’ दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पती आणि सासरच्या लोकांसमोर हा प्रकार घडला. या प्रकरणी पीडित २६ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून रायपूर पोलिसांनी पतीविरुद्ध नवीन भारतीय न्याय संहिता आणि मुस्लीम महिला विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिना कौसर यांचा विवाह सन २०१४ मध्ये आरोपी अमिन खान मुस्तफा खान पठाण याच्यासोबत मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथे झाला होता. लग्नानंतर काही दिवस सुरळीत गेल्यानंतर आरोपी पती अमिन खान हा सतत हिना कौसर यांच्या चारित्र्यावर संशय घेत असे. या संशयावरून तो तिला नेहमी मानसिक व शारीरिक त्रास देऊन शिवीगाळ करत होता. १९ मे २०२६ रोजी हिना कौसर या सैलानी येथे आपल्या भाचीच्या लग्नासाठी आल्या होत्या. दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास लग्नघरात फिर्यादी, तिचा पती अमिन खान, सासू जाकीरा बी मुस्तफा खान, नणंद सुमया इलीयास, दुसरी नणंद मरजीना सयदपठाण, तसेच फिर्यादीची आई रेयाना शेख गुलाम खाजा आणि मोठी बहीण फरजाना शेख हे सर्व एकत्र बसलेले होते. या दरम्यान पती अमिन खान याने पुन्हा एकदा पत्नी हिना कौसरच्या चारित्र्यावर जाहीर संशय घेतला. सर्वांसमक्ष त्याने अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, वाद टोकाला गेल्यानंतर आरोपी पती अमिन खान याने संतापून “मला तुझ्यासोबत राहायचे नाही, तू छिनाल रांड आहेस. मी तुला दोन मुलांसह सोडत असून मी तुला तलाक देत आहे,” असे म्हणून त्याने फिर्यादीची आई आणि बहीण फरजाना शेख यांच्या इसमक्ष “तलाक, तलाक, तलाक”, असे तीन वेळेस म्हणून बेकायदेशीरपणे त्रिवार तलाक दिला. एवढ्यावरच न थांबता, “तू येथून आत्ताच्या आत्ता तुझ्या आईकडे चालली जा, नाहीतर तुला जिवाने मारून टाकीन,” अशी धमकीही दिली.
या प्रकारानंतर पीडित हिना कौसर हिने रायपूर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. तिच्या लेखी रिपोर्टवरून रायपूर पोलिसांनी २० मे रोजी आरोपी पती अमिन खान मुस्तफा खान पठाण (वय ३० वर्षे), रा. सैलानी याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६,३५१(२),३५१(३) सह कलम ४ मुस्लीम महिला (विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण) कायदा २०१९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार कैलास खार्डे हे करीत आहेत. सदर घटनेमुळे सैलानी परिसरात आणि मुस्लीम समाजात त्रिवार तलाक कायद्याच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
