बुलढाणा जिल्हा गुन्हेगारी वृत्तविशेष: चोरी, हाणामारी, शासकीय कामात अडथळा आणि अपघाताच्या घटनांनी जिल्हा हादरला; विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात गेल्या २४ ते ४८ तासांत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये महावितरणच्या डीपीवरील विद्युत तारांची चोरी, लोटगाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरून महिलेला झालेली मारहाण, सेवानिवृत्त शिक्षकाच्या बंद घरात झालेली घरफोडी, जळतण उचलण्याच्या वादातून लोखंडी टामीने झालेला जीवघेणा हल्ला, सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणावरून ग्रामपंचायत अधिकार्‍याला मिळालेली जीवे मारण्याची धमकी आणि भीषण रस्ता अपघातात एका वृद्धाचा झालेला दुर्दैवी मृत्यू या प्रमुख घटनांचा समावेश आहे.

मलकापूर ग्रामीण: पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या जांभूळधाबा शिवारामध्ये वीज कंपनीच्या डीपीवरील महागड्या तारांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ अमोल भास्कर सावळे यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टनुसार, मलकापूर ग्रामीण भाग-०३ च्या कार्यक्षेत्रात जांभूळधाबा ए.जी. फिडरवरील ज्ञानदेव पांडुरंग वाघोदे यांच्या शेतात असलेल्या डीपीवरून कोणीतरी अज्ञात चोरट्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन १८ गाडे लघुदाब वाहिनीची (एलटी लाईन) तार कापून चोरून नेली. चोरीला गेलेल्या या विद्युत तारेची एकूण किंमत ७२ हजार रुपये सांगण्यात आली आहे. याप्रकरणी मलकापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार सविता मोरे ह्या करत आहेत.

खामगाव ग्रामीण: पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टेंभुर्णा येथे एकाच गल्लीत राहणाऱ्या नातेवाईकांमध्ये जुन्या वादावरून आणि रस्त्यावर लोटगाडी लावण्याच्या कारणावरून जोरदार भांडण झाले. यात एका महिला मजुराला तिच्याच दिराने व सासूने अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे.

फिर्यादी वनिता हिवरकार आणि आरोपी हे नात्याने वहिनी व दीर-सासू असून ते एकाच मोहल्ल्यात समोरासमोर राहतात. घटनेच्या दिवशी फिर्यादी वनिता ही तिच्या घरासमोरील अंगणात झाडझुड करत असताना, तिचा दीर आरोपी क्र. १ निलेश हिवरकार याने “येथे रस्त्यामध्ये मासे विकण्याची लोटगाडी कशाला लावली?” या कारणावरून वाद उकरून काढला. निलेशने रागाच्या भरात ती लोटगाडी पलटी करून फेकून दिली. त्यानंतर फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत तिच्या पाठीवर जोरात लाथ मारली व तिचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर, आरोपी क्र. २ सासू द्वारकाबाई हिने फिर्यादी वनिताचे डोक्याचे केस पकडून तिला जमिनीवर खाली पाडले, तर आरोपी क्र. ३ रामभाऊ हिवरकार याने “तुमचे गावात जगणे मुश्कील करून टाकीन, पुन्हा रस्त्यावर गाडी लावली तर हातपाय तोडून टाकीन”, अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी निलेश रामभाऊ हिवरकार, द्वारकाबाई रामभाऊ हिवरकार, रामभाऊ हिवरकार (सर्व रा. टेंभुर्णा, ता. खामगाव). यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार बाळकृष्ण सहदेव फुंडकर हे करत आहेत.

खामगाव शहर: खामगाव शहरातील तायडे कॉलनी परिसरामध्ये एका बंद घराला टार्गेट करून अज्ञात चोरांनी घरफोडी केली आहे. घरमालक कुटुंबासह बाहेरगावी गेले असता ही घटना घडली.

सेवानिवृत्त शिक्षक शाफीउर रेहमान हे दिनांक ४ मे रोजी सकाळी आपल्या कुटुंबासह नातेवाईकांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. घर बंद असल्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरांनी मुख्य दाराच्या कडी-कोंडा कुलुपासह तोडून किंवा काढून घरात प्रवेश केला. चोरांनी घरातील बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडून आतील रोख २४ हजार ५०० रुपये आणि चांदीचे दागिने व शिक्के असा एकूण ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी ६ मे रोजी परत आले असता हा प्रकार उघडकीस आला, त्यानंतर चौकशी करून १९ मे रोजी खामगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस अंमलदार प्रदीप रुस्तुम मोठे हे करत आहेत.

जळगाव जामोद: जळगाव जामोद तालुक्यातील एलोरा येथे घरासमोर पडलेले जळतण उचलण्याच्या कारणावरून शेजाऱ्यांनी एका शेतकऱ्यावर लोखंडी टामीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

फिर्यादी विजय तिजारे हे आपल्या घरासमोर रस्त्यात पडलेले जळतण उचलत असताना आरोपी संजय वक्ते याने त्यांना हटकले व जुन्या वादाची कुरापत काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. याच वेळी संजय वक्तेची दोन मुले मयुर आणि अमोल हे हातामध्ये लोखंडी टामी (लोखंडी रॉड) घेऊन तिथे आले. त्यांनी थेट विजय तिजारे यांच्या डोक्यावर आणि हातावर लोखंडी टामीने जबर प्रहार केले, ज्यामुळे विजय गंभीर जखमी झाले. मारहाण करताना आरोपी संजय वक्ते याने फिर्यादी व त्यांच्या संपूर्ण परिवाराला “जिवाने मारून टाकीन” अशी धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील व महिला पोलीस अंमलदार शेडगे यांनी १९ मे रोजी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास शेडगे ह्या करीत आहेत.

जलंब: जलंब-खामगाव रस्त्यावर एका भरधाव अ‍ॅक्टिव्हा चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अकोला येथील एका ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अ‍ॅक्टिव्हा चालक स्वतः देखील जखमी झाला आहे.

फिर्यादी आशा पाटील यांचे भाऊ मनोहर गंगाधर पाटील हे जलंब-खामगाव रोडने जात असताना, भोरसी गणेश मंदिरासमोर पाठीमागून येणाऱ्या अ‍ॅक्टिव्हा स्कुटी (क्र. एमएच-२९-एडब्ल्यू-२०९३) च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अतिशय भरधाव वेगात व हलगर्जीपणाने चालवून मनोहर पाटील यांना जोरदार धडक दिली. या अपघातात मनोहर पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या धडकेत अ‍ॅक्टिव्हा चालक सुधाकर वाघमारे हा स्वतः देखील गाडीवरून पडून जखमी झाला आहे. याप्रकरणी मृतकाच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून जलंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार नन्हेखा तडवी करत आहेत.

शेगांव ग्रामीण: शेगाव तालुक्यातील चिंचखेड येथे जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे घर बांधण्यासाठी अतिक्रमण करणाऱ्या ग्रामस्थांना हटकले असता, त्यांनी ग्रामपंचायत अधिकार्‍याला शासकीय कामात अडथळा आणून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

चिंचखेड येथील जि.प. मराठी शाळेने गावातील लोकांना शेती व वहिवाटीसाठी शाळेच्या पाठीमागील बाजूस ८ फूट रुंदीचा सार्वजनिक रस्ता दिला आहे. या रस्त्यावर आरोपी सोनाबाई चोपडे, बापुना चोपडे आणि भगवान चोपडे यांनी संगनमत करून स्वतःचे घर बांधण्याच्या उद्देशाने मोठे खड्डे खोदले व गावकऱ्यांचा येण्या-जाण्याचा सार्वजनिक रस्ता पूर्णपणे बंद केला. ग्रामपंचायत अधिकारी मदन सावरकर हे अधिकृत कर्तव्यावर असताना त्यांनी आरोपींना रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत हटकले. याचा राग येऊन तिन्ही आरोपींनी सावरकर यांच्याशी हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा (अटकाव) निर्माण केला आणि त्यांना जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार अतुल आगलावे हे करीत आहेत.

मलकापूर शहर: मलकापूर शहरातील गजानन नगरी भागात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय व्यक्तीचा छातीत अचानक तीव्र वेदना झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मर्ग नोंदवण्यात आला आहे.

मयत सुधीर कंकाळे यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी तातडीने मलकापूर येथील ‘आयुष्यमान रुग्णालय’ येथे भरती केले होते. मात्र, तिथे तपासणी अंती डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच ‘मृत घोषित’ केले. त्यानंतर नातेवाईकांनी पुढील कायदेशीर कार्यवाही आणि शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय (मलकापूर) येथे आणला. उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. स्मिता रोकडे यांच्या सहीच्या लेखी मेमोवरून मलकापूर शहर पोलिसांत मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार संजय निंभोळकर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!