गोंधळ घालण्यास मज्जाव केल्याने तरुणावर चाकूने हल्ला; मोताळा तालुक्यातील कोथळी येथील धक्कादायक घटना, चौघांवर गुन्हा दाखल

अजय टप

मोताळा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):रस्त्यावरील गुंडगिरी आणि हुल्लडबाजीला विरोध करणे एका तरुणाला चांगलाच महागात पडल्याची धक्कादायक घटना मोताळा तालुक्यातील कोथळी परिसरात घडली आहे. बहिणीसोबत गावाकडे जात असताना रस्त्यात गोंधळ घालणाऱ्या टोळक्याला ‘गोंधळ करू नका’ असे सांगणाऱ्या २० वर्षीय तरुणावर चार जणांनी संगनमत करून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मुख्य आरोपीने तरुणाच्या उजव्या मांडीवर चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे.
या प्रकरणी बोराखेडी पोलिसांत उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मोताळा तालुक्यात एकच खळबळ उडाली असून परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी अक्षय देविदास बावस्कर (वय २० वर्षे) रा. बोरखेड हा २१ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास आपली बहीण आणि इतर नातेवाईकांसह मोताळा येथून आपल्या दुचाकीने मूळ गावी बोरखेडकडे जाण्यासाठी निघाला होता. रात्री ८ ते साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन खरबडी गावाच्या थोडे पुढे, कोथळी शिवारात आले असता, रस्त्यावर काही तरुण मोठमोठ्याने आरडाओरड करून गोंधळ घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रात्रीच्या वेळी भररस्त्यात सुरू असलेला हा प्रकार पाहून अक्षयने सामाजिक बांधिलकी आणि सुरक्षेच्या भावनेतून त्या तरुणांना हटकले व येथे रस्त्यावर मोठमोठ्याने आरडाओरड करून गोंधळ करू नका,अशी विनंती केली. मात्र, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या त्या टोळक्याला अक्षयचा हा सल्ला रुचला नाही. त्यांनी उलट अक्षयसोबतच वाद घालण्यास सुरुवात केली.
क्षुल्लक कारणावरून चिडलेल्या या चारही आरोपींनी एकत्र येऊन अक्षयला घेरले. आरोपींनी प्रथम त्याला अत्यंत अश्लील आणि घाणेरडी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अक्षयने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्याला चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर आरोपींमधील क्र. १ चा आरोपी शेख सलीम शेख रहीम याने आपल्याजवळील तीक्ष्ण चाकू काढून अक्षयवर हल्ला केला. त्याने अक्षयच्या उजव्या मांडीवर चाकूने जोरदार वार केले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन अक्षय गंभीर जखमी झाला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अक्षयच्या बहिणीसह सोबत असलेले इतर नातेवाईक प्रचंड घाबरले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक गोळा होऊ लागल्याचे पाहून आरोपींनी तेथून पळ काढला.
घटनेनंतर जखमी अक्षय बावस्कर याला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी अक्षयने बोराखेडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार श्रीकांत चिंटवार हे करीत आहेत. या घटनेमुळे बोरखेड आणि कोथळी परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. “रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबासह प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना जर अशा प्रकारे हुल्लडबाजांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असेल आणि थेट जीवघेणे हल्ले होत असतील, तर सुरक्षेचे काय?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. रात्रीच्या वेळी ग्रामीण भागातील रस्त्यांवर पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!