अजय टप
नांदुरा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात सध्या वाळू आणि रेती माफियांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न पडावा अशी एक मोठी कारवाई नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने नांदुऱ्यात घुसून तब्बल ७६ लाख रुपयांची अवैध रेती तस्करी पकडली. एलसीबीच्या या धडक कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले असले, तरी स्थानिक नांदुरा पोलिसांच्या ‘गाढ झोपेवर’ आणि कार्यक्षमतेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशान्वये बुलढाणा जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात बेकायदा व्यवसायांवर धाडसत्र सुरू आहे. दरम्यान, बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच वेळी ५ जुने वापरते पिवळ्या रंगाचे टिप्पर रेतीची अवैध वाहतूक करताना जप्त केले आहेत. एका टिप्परची किंमत साधारण १५ लाख रुपये म्हणजेच एकूण ७५ लाख रुपयांचे हे टिप्पर आहेत. त्यामध्ये प्रत्येकी २ ब्रास याप्रमाणे एकूण १० ब्रास चोरटी रेती (किंमत १ लाख रुपये) जप्त करण्यात आली आहे. नदीपात्रातून आणि तालुक्याच्या रस्त्यांवरून दिवसा-ढवळ्या निसर्गाची संपत्ती लुटली जात असताना स्थानिक पोलीस नक्की कोणत्या ‘अर्थपूर्ण’ कामात व्यस्त होते?, असा प्रश्न या कारवाईमुळे उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे,महिला पोलीस अंमलदार वनिता शिंगणे, पोलीस अंमलदार अमोल शेजोळ, अजीस परसुवाले, मनोज खरडे, शिवानंद हेलगे यांनी ही धडक कारवाई केली. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), सहकलम २१(१), (२) गौण खनिज अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. परंतु, या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांची अब्रू मात्र वेशीवर टांगली गेली आहे. एलसीबीला जेव्हा बाहेरून येऊन नांदुऱ्यात रेती चोर पकडावे लागतात, तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा होतो की, स्थानिक पोलीस एकतर या रेती तस्करांना पाठीशी घालत होते किंवा ते पूर्णपणे अकार्यक्षम आहेत. एलसीबीने नांदुऱ्यात येऊन स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर मारलेला हा मोठा ‘थप्पड’ आहे, अशी चर्चा आता तालुक्यात रंगू लागली आहे.
