अजय टप
खामगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पुरवार गल्लीतील एका घरावर धाडसी छापा टाकून चालणाऱ्या ‘एक्का-बादशहा’ नावाच्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. २१ मे रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी ७ जुगार्यांना रंगेहात अटक केली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईलसह एकूण १ लाख ४ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना, पुरवार गल्ली येथील स्वप्नील गांधी याच्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत ५२ ताश पत्त्यांवर पैशांची हारजीत करून ‘एक्का-बादशहा’ नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंदार पुरी, पोलीस अंमलदार देवेन्द्र शेळके, निलसिंग चव्हाण, संदीप टाकसाळ, केशव झ्याटे आणि महिला पोलीस अंमलदार पल्लवी बोर्डे यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी स्वप्नील भिकुलाल गांधी (वय ४० वर्षे) रा. पुरवारगल्ली, आकाश विलास किलोलिया (वय ३३ वर्षे) रा. चामुंडामाता मंदिर, अमोल शंकरराव कुकडे (वय ३६ वर्षे) रा. हनुमान मंदिराजवळ, गोपाळनगर, निलेश सुभाष कल्याणकर (वय ३५ वर्षे) रा. दालफैल, कृष्णकुमार नंदकिशोर राठी (वय २८ वर्षे) रा. शिवाजीवेस सराफा, मयुरेश मंगेश देशमुख (वय ३० वर्षे) रा.सुताळपुरा, मंगेश राजू बाभुळकर (वय २६ वर्षे) रा. हनुमानगल्ली, गोपाळनगर हा पैशाच्या हरजितवर एक्का बादशहा नावाचा जुगार खेळतांना रंगेहात मिळून आला. पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातून जुगाराच्या डावावरील १५०० रुपयांसह एकूण २६ हजार ३२० रुपये रोख, ७ अँड्रॉइड मोबाईल, इतर साहित्य, असा ५ एकूण १ लाख ४ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी पोलीस अंमलदार देवेंद्र शेळके यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याचे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
