दोन लाखांची नोकरी नाकारून इंजिनिअर बनला संन्यासी! २८ वर्षीय शिवाजी वरणकार यांचा थक्क करणारा प्रवास

संग्रामपूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): आजच्या काळात लाखो रुपयांचे पॅकेज आणि आलिशान आयुष्य सोडून अध्यात्माचा मार्ग निवडणे ही ऐकायला एखाद्या कथेसारखी वाटते, पण संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथील २८ वर्षीय तरुण शिवाजी विजय वरणकार यांनी हे प्रत्यक्षात करून दाखवले आहे. दरमहा २ लाख रुपयांच्या नोकरीचा त्याग करून त्यांनी ‘इस्कॉन’मध्ये दीक्षा घेतली असून, आता त्यांचे नामकरण ‘मुरली वंदन प्रभू’, असे करण्यात आले आहे.

शिवाजी वरणकार यांचे प्राथमिक शिक्षण टुनकी येथील स्थानिक शाळेत झाले. पुढील उच्च शिक्षणासाठी ते पुण्याला गेले. पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना ते ‘इस्कॉन हॉस्टेल’मध्ये राहत होते. याच दरम्यान त्यांचा संपर्क राधेश्याम प्रभुजी महाराज यांच्याशी आला. या संपर्कातूनच त्यांच्या मनात अध्यात्माची गोडी निर्माण झाली. इलेक्ट्रॉनिक अभियंता म्हणून २ लाख रुपयांची उत्तम नोकरी मिळत असतानाही, त्यांनी भौतिक सुखाचा त्याग करून पूर्णवेळ जनसेवा आणि ईश्वर भक्तीचा मार्ग निवडला. शिवाजी यांनी संन्यास घेतल्याचे समजताच वरणकार कुटुंबियांनी अजिबात नाराजी न दाखवता त्यांच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला. नुकतीच त्यांनी टुनकी गावाला आणि आपल्या परिवाराला सदिच्छा भेट दिली.

मुरली वंदन प्रभू यांनी आपले गुरू राधेश्याम प्रभुजी महाराज यांच्यासोबत कंबोडिया आणि मलेशिया येथे जाऊन धर्मजागृतीचे काम केले आहे. धार्मिक प्रचार आणि प्रसारासाठी ते लवकरच अमेरिकेचा प्रवास करणार आहेत. “त्यांच्या हातून अशीच देश-विदेशात जनसेवा घडो आणि त्यांना परमात्मा प्राप्ती होवो,” अशी इच्छा त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

२० वर्षांपूर्वीची ‘ती’ भविष्यवाणी ठरली तंतोतंत खरी!

शिवाजी वरणकार यांच्या संन्यासाची एक रंजक बाजू म्हणजे २० वर्षांपूर्वी वर्तवलेलं भाकीत! शिवाजी प्राथमिक शाळेत असताना, वरणकार कुटुंब बावनबीर (सध्या मुक्काम अकोला) येथील बाळासाहेब जोशी यांच्याकडे गेले होते. त्यावेळी ज्योतिषी जोशी यांनी हस्तरेषा पाहून एक मोठे भाकीत केले होते. वरणकार कुटुंबातील ४ ही मुले उच्च शिक्षण घेऊन इंजिनिअर बनतील. शिवाजी वरणकार हे धार्मिक कार्यासाठी परदेश प्रवास करतील आणि जागतिक दर्जाचे आध्यात्मिक गुरू बनतील. आज २० वर्षांनंतर हे भाकीत तंतोतंत खरे ठरले आहे. कुटुंबातील चारही मुले इंजिनिअर झाली असून शिवाजी यांनी इस्कॉनमध्ये दीक्षा घेतली आहे, अशी माहिती खरेदी विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष विश्वासराव वरणकार पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!