अजय टप
बुलढाणा (हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात सध्या “ऑल इज वेल” चा आव आणून पोलीस अधीक्षक नीलेश तांबे सरांच्या डोळ्यात धूळफेक करू पाहणाऱ्या काही ठाणेदारांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. “आमच्या हद्दीत पत्ताही हलत नाही,” असा दावा करणाऱ्या ठाणेदारांच्या नाकाखाली काय काय चालतं, याचं जळजळीत दर्शन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घडवून आणले आहे. एसपी नीलेश तांबे यांच्या कडक पवित्र्यामुळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या टीमने एकाच दिवसात ४ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत जुगार आणि दारू अड्ड्यांचे पार बिंग फोडले आहे! या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे तर धाबे दणाणलेच, पण आपल्या हद्दीत गाढ झोपलेल्या ठाणेदारांची झोपही पार उडाली आहे.
तामगाव पोलीस स्टेशन: ‘पत्ता’ कट, तीन पंटर गजाआड!
तामगाव पोलिसांना ज्या गोष्टीचा सुगावा लागला नव्हता, तिथे एलसीबीच्या टीमने थेट धाड टाकली. तामगाव हद्दीत पत्त्यांचा डाव रंगात आलेला असतानाच पोलिसांनी एन्ट्री घेतली. पीएसआय पंकज सपकाळे, एजाज खान, वनिता शिंगणे, अमोल शेजोळ, अजीस परशुवाले, मनोज खार्डे आणि शिवानंद हेलगे यांच्या पथकाने जुगाराच्या दोन केसेस करत ६ हजार ९९० रुपयांचे जुगार साहित्य जप्त केले. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याचे कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव राजा: मटका किंगचा आकडा चुकला!
पिंपळगाव राजा हद्दीत एक महाभाग वरली मटक्याचे आकडे लावून “लखपती” बनण्याचे स्वप्न पाहत होता. पण स्थानिक पोलिसांऐवजी एलसीबीच्या पथकाने त्याचा नंबर लावला! पैशाच्या हारजितवर वरली-मटका जुगार खेळणाऱ्या आरोपीवर पोलीस अंमलदार भारत जाधव, वैभव मगर आणि कोमल इंगळे यांनी झडप घालत जुगाराच्या साहित्यासह १ हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिखली: गावठी दारूचा बेत ‘कडू’ झाला!
चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारूचा सुळसुळाट सुरू होता. स्थानिक यंत्रणा सुस्त असताना एलसीबीने तिथे ‘ड्राय डे’ घोषित केला. पोलीस अंमलदार गजानन दराडे, युवराज राठोड आणि अरविंद बडगे यांच्या पथकाने दारूच्या नशेत झिंगणाऱ्यांवर महाराष्ट्र दारू बंदी कायद्याचे कलम ६५ (ड)(फ) अन्वये गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी थेट पोलीस ठाण्यात केली. तसेच आरोपीच्या ताब्यातून ४ हजार ८०० रुपयांची गावठी हातभट्टीची दारू आणि मोहा सडवा जप्त करण्यात आला.
मलकापूर शहर: मटक्यावर बसली ‘धाड’!
मलकापूर शहरातही गुपचूप वरली मटका खेळवून खिसे गरम करण्याचे काम सुरू होते. एलसीबीने इथेही ठाणेदारांना ‘सरप्राईज’ दिले. पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, अनुप मेहेर, सतीश हाताळकर आणि विजय वारुळे यांनी छापा मारत पैशाच्या हारजीतवर वरली-मटका नावाचा जुगार खेळणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडून त्याच्या ताब्यातून १ हजार ५५५ रुपये नगदी आणि वरली मटका साहित्य जप्त केले. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्याचे कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चारही कारवायांवरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, एसपी नीलेश तांबे कमालीचे फॉर्ममध्ये आहेत. स्थानिक ठाणेदार “आमच्या हद्दीत सगळं कसं शांत-शांत आहे” असा रिपोर्ट साहेबांना देत होते. मात्र, एलसीबीच्या या धडक मोहिमेने ठाणेदारांची ही ‘धूळफेक’ उघडी पाडली आहे. “साहेब दिल्लीत आणि एलसीबी गल्लीत” म्हणत या पथकाने स्थानिक पोलिसांची चांगलीच गोची केली आहे. आता या कारवायांनंतर तरी संबंधित ठाणेदार जागे होणार का? की पुन्हा एलसीबीच येऊन त्यांच्या हद्दीत ‘झाडू’ मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे!
