अजय टप
चिखली,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील बोरागाव काकडे येथे एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ३२ वर्षीय विवाहित महिलेचा दुचाकीवरून पाठलाग करून, तिचा विनयभंग करत शरीरसुखाची मागणी केल्याची अत्यंत गंभीर घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर, “जर माझ्यासोबत आली नाही तर तुझे फोटो इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर व्हायरल करेन,” अशी धमकी देत संबंधित महिलेला व तिच्या पतीला चाकूने खुपसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून अमडापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण चिखली तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अमडापूर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बोरगाव काकडे (ता.चिखली) येथील ३२ वर्षीय पीडिता या आपल्या कौटुंबिक आणि दैनंदिन कामात व्यस्त असताना, गावचाच रहिवासी असलेला आरोपी विष्णू श्रीराम काकडे (वय ४५ वर्षे) हा गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर वाईट नजर ठेवून होता. २० मे २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पीडित महिला काही कामानिमित्त जात असताना, आरोपी विष्णू काकडे याने स्वतःच्या मोटारसायकलवरून तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. पीडितेने याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीचा उद्देश अत्यंत वाईट होता. निर्जन स्थळाचा फायदा घेत आरोपीने आपली दुचाकी पीडितेच्या अगदी जवळ आणली. काही समजण्याच्या आतच आरोपीने गाडीवरून उतरून पीडित महिलेला पाठीमागून लज्जास्पदरित्या घट्ट मिठी मारली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे महिला प्रचंड घाबरली. तिने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने थेट तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.
पीडित महिलेने आरोपीच्या कृत्याला विरोध केला असता, आरोपी विष्णू श्रीराम काकडे याचा राग अनावर झाला आणि तू जर माझ्यासोबत आली नाहीस आणि माझ्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर तुझे फोटो माझ्याकडे आहेत. ते सर्व फोटो मी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर व्हायरल करून तुझी समाजात बदनामी करेन, अशी धमकी दिली. एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही, तर त्याने जाहीरपणे अत्यंत अश्लील, घाणेरडी आणि शिवीगाळ करणारी भाषा वापरली. पीडितेचा उल्लेख अत्यंत अपमानास्पद शब्दांत करून, त्याने पीडितेला आणि तिच्या पतीला थेट जीवे मारण्याची धमकी दिली. तू जर कुणाला काही बोललीस, तर तुला आणि तुझ्या नवऱ्याला चाकू खूपसून जीवे मारून टाकीन, अशी जीवघेणी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
याप्रकरणी पीडितेने अमडापूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७४, ७५(१), ७८, ३५१(२), ३५२, २९६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील सखोल तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण टेकाळे हे करीत आहेत. या घटनेने ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
