बुलढाणा जिल्हा गुन्हेगारी वृत्त: वाळू तस्करांवर मोठी कारवाई, देहविक्री अड्ड्यावर पोलिसांचा छापा; चोऱ्या आणि मारहाणीच्या घटनांनी जिल्हा हादरला!

अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत गेल्या २४ ते ४८ तासांत अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये नांदुरा येथे तब्बल ५५ लाखांहून अधिक रुपयांची अवैध वाळू व टिप्पर जप्त करण्यात आले आहेत, तर शेगाव येथे एका नामांकित गेस्ट हाऊसवर पोलिसांनी छापा टाकून देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. यासोबतच चोऱ्या, प्राणघातक हल्ले आणि रस्ते अपघाताच्या घटनांची नोंद झाली आहे.
नांदुरा: नांदुरा पोलिसांचे पथक पिंप्री कोळी शिवार भागात पेट्रोलिंग करत असताना, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ४ टिप्परवर छापा टाकण्यात आला. शासनाचा महसूल बुडवून विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करताना आरोपी रवींद्र जाधव (रा.जवळा बाजार), मोहनगीर गोसायी (रा.वडनेर भोलजी), जितेंद्र देवकर (रा. हरसोडा) आणि जितेंद्र झनके (रा. बहापुरा) या चार आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ४ जुने वापरते टिप्पर (अशोक लेलँड आणि टाटा कंपनीचे) आणि त्यातील अंदाजे ७ ब्रास वाळू, असा एकूण ५५ लाख २० हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार अमोल खोंदील हे करत आहेत.
शेगाव शहर:  शेगाव येथील इकबाल चौकात असलेल्या ‘आशिर्वाद गेस्ट हाऊस’मध्ये महिलांकडून जबरदस्तीने देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पो.उप.नि. कुणाल जाधव यांनी कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी देहविक्रीचा अड्डा चालवणारा मुख्य आरोपी हुसेन खान अजगर खान (रा. शेगाव) आणि आशिर्वाद हॉटेलच्या मूळ मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गणेश खरात (खामगाव), आदेश काळे (अमरावती), यश पैठणकर (खामगाव) आणि गजानन निर्मळ (खामगाव) यांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. रोकड आणि इतर साहित्यासह ४ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मेहेत्रे करत आहेत.
शेगाव शहर: शेगाव येथील रहिवासी असलेल्या २१ वर्षीय विवाहिता महविश फातीमा साकीब शाह यांनी सासरच्या छळाविरुद्ध तक्रार दिली आहे. लग्नानंतर माहेरून हुंड्यासाठी १२ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून पती साकीब शाह, सासरे मंजूर शाह, सासू वहीदा बी यांच्यासह एकूण ७ जणांनी त्यांना वारंवार शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. शेगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार सुरेंद्रसिंग चव्हाण करत आहेत.
मलकापूर ग्रामीण: सिरसोडी शिवारातील वडोदा रेल्वे डी.पी. वरून अज्ञात चोरट्यांनी महावितरणच्या २० गाड्यांवरील लघुदाब वाहिनीच्या तारा आणि दोन तुटलेले पी.सी. पोल, असा एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. प्रधान तंत्रज्ञ अमोल सावळे यांच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांत अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धामणगाव बढे: शिवराज हॉटेलच्या पाठीमागे उभी केलेली हॉटेल मालक सागर बढे यांची हिरव्या रंगाची बजाज सी.टी. ११० एक्स मोटारसायकल (क्र. एमएच-२८-बीपी-६८१३ किंमत अंदाजे २० हजार रुपये) अज्ञात चोरट्याने लंपास केली. पुढील तपास पोलीस अंमलदार सुरेश सोनवणे करत आहेत.
खामगाव शहर: सुटाळा खुर्द येथे एकत्र दारू प्यायल्यानंतर आरोपी कृष्णा ठाकरे हा रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना विनाकारण शिवीगाळ करत होता. त्याला रोखले असता, त्याने मित्र सागर इंगळे ( वय ३५ वर्षे) याच्या कपाळावर जमिनीवरील फरशीचा तुकडा मारून गंभीर जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
मलकापूर शहर: बेलाड येथे जुन्या वादाचा राग मनात धरून वैभव संभाजी हनुवते (वय २५ वर्षे) याने कामावर जाणाऱ्या संघपाल इंगळे (वय ४२ वर्षे) यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. तसेच खिसातून चाकू काढून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पुढील तपास सपोनि दिलीप राठोड हे करत आहेत.
हिवरखेड: चिंचपुर येथील जिजामाता महाविद्यालयासमोरून पतीसोबत मोटारसायकलने माहेरी जात असताना अचानक एक बकरी आडवी आली. पतीने अचानक ब्रेक दाबल्यामुळे पाठीमागे बसलेल्या बबिता आशिष राठोड (वर्षे वर्षे) रा. हरणी, चिखली या खाली पडल्या. डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हिवरखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मलकापूर शहर: सैलानी बाबांचे दर्शन घेऊन मोटारसायकलने परतणाऱ्या संदीप बाळू कोळी आणि त्यांच्या पत्नीला गोडे कॉलेजसमोर एका अज्ञात पांढऱ्या रंगाच्या कार क्रमांक एमएच-३०-बीएल-७८८९ मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पती-पत्नी दोघांनाही गंभीर फॅक्चर झाले असून कार चालक अपघात करून पळून गेला. जखमींवर जळगाव खान्देश येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस अंमलदार रवींद्र दळवी हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!