अजय टप
खामगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): मजुरीचे हक्काचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या बौद्ध समाजाच्या एका वेल्डर आणि त्यांच्यासोबत असलेल्या मजुरांना जातिवाचक शिवीगाळ करत लाठ्या-काठ्यांनी आणि राफ्टरने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना खामगाव जवळील पिंपरी गवळी रोडवर घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात फिर्यादी, त्यांचा तरुण मुलगा आणि इतर मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे.
खामगाव शहरातील बाळापूर फैल परिसरात राहणारे गणेश जनार्धन वानखडे (वय ४९ वर्षे) हे अनुसूचित जातीमधील असून ते वेल्डिंग आणि मजुरीचे काम करतात. २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गणेश वानखडे हे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीचे हक्काचे पैसे मागण्यासाठी पिंपरी गवळी रोडवरील स्टोन क्रशर ऑफिसजवळ गेले होते. तेथे उपस्थित असलेला सुपरवायझर सागर रमेश टिकार (रा. टेंभुर्णा, ता. खामगाव) याने पैसे देण्यास टाळाटाळ करत, अगोदर मला मजूर दाखव, असे म्हणून त्यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर वानखेडे यांनी मजूर लोक दाखवले. मात्र, हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. वानखेडे आणि त्यांचे मजूर पिंपरी गवळी रोडवरून जात असताना, टेंभुर्णा गावातील ३० ते ४० लोकांचा जमाव हातात लाठ्या-काठ्या घेऊन त्यांच्या दिशेने येताना दिसला. या हिंसक जमावाला पाहून वानखेडे आणि मजूर भयभीत झाले. जमावातील काही लोकांनी यांच्यामध्ये गणेश चेल्लार कोण आहे?, असे विचारत शोधण्यास सुरुवात केली आणि अचानक १० ते १२ जणांच्या टोळक्याने फिर्यादी व मजुरांना लाकडी काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. हल्ल्याची भीषणता पाहून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी फिर्यादी गणेश वानखडे, त्यांचा मुलगा आणि इतर मजूर पळत जाऊन जवळच असलेल्या बुलढाणा वेअर हाऊसच्या आत शिरले. मुख्य आरोपी सागर रमेश टिकार आणि त्याचा भाऊ यांनी संगनमत करून त्या १० ते १२ अज्ञात आरोपींच्या जमावाला चिथावणी दिली. आरोपींनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जातिवाचक शिवीगाळ केली. आणि गोदामाच्या आत घुसून पुन्हा एकदा लाठ्या-काठ्या आणि लाकडी राफ्टरने मजुरांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात गणेश जनार्धन वानखडे, अर्जुन गणेश वानखडे, रघुनाथ विठ्ठल बारसकर, चेतन कैलास विटे जखमी झाले.
घटनेनंतर जखमी मजुरांनी तात्काळ खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांमार्फत जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी पाठवण्यात आले. याप्रकरणी गणेश वानखडे यांच्या जबाबावरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा १९८९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या मुख्य आरोपी सागर टिकार, त्याचा भाऊ आणि इतर १० ते १२ अज्ञात आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.
