अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून, गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. मोताळा तालुक्यातील शेलापूर बुद्रुक येथे पाण्याच्या आउटलेटच्या वादातून विळ्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला, तर शेगाव तालुक्यातील अळसणा येथे किरकोळ कारणावरून दोन तरुणांमध्ये कटर आणि लोखंडी आसारीने एकमेकांवर खुनी हल्ले चढवल्याचे समोर आले आहे. याशिवाय खामगाव तालुक्यातील कुंबेफळ झोपडपट्टीत एका विवाहितेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची आणि जाब विचारणाऱ्या तिच्या भावांना तिघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
बोराखेडी: मोताळा तालुक्यातील शेलापूर बुद्रुक येथे शेतातील पाण्याच्या आउटलेटच्या पाईपाच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील फिर्यादी प्रल्हाद शामराव मानकर (वय ४९ वर्षे) रा. शेलापूर बुद्रुक, ता. मोताळा, जि. बुलढाणा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २४ मे २०२६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ते गावात हजर असताना, गावचाच रहिवासी असलेला आरोपी रामभाऊ काशीराम खराटे हा तिथं आला. फिर्यादी प्रल्हाद मानकर यांनी शेतातून काढलेल्या आउटलेटच्या पाईपाच्या कारणावरून आरोपीने त्यांना अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. प्रल्हाद यांनी शिवीगाळ करण्यास मनाई केली असता, चिडलेल्या रामभाऊ खराटे याने आपल्या जवळील धारदार विळा काढून थेट प्रल्हाद यांच्या उजव्या डोळ्यावर मारला. या हल्ल्यात प्रल्हाद यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.
हा वाद पाहून प्रल्हाद यांची वृद्ध आई आणि मुलगी भांडण सोडवण्यासाठी घटनास्थळी धावून आल्या. मात्र, आरोपींचा राग एवढ्यावरच शांत झाला नाही. आरोपी रामभाऊ खराटे याने प्रल्हाद यांच्या आईच्या डाव्या हाताच्या मनगटावर विळ्याने जोरदार वार करून त्यांनाही रक्ताळलेल्या अवस्थेत जखमी केले. याच वेळी दुसरा आरोपी कैलास रामभाऊ खराटे याने प्रल्हाद यांच्या मुलीच्या उजव्या हातावर मोठा दगड फेकून मारला. या संपूर्ण घटनेत आरोपी रामभाऊ काशीराम खराटे, कैलास रामभाऊ खराटे आणि शकुंतला रामभाऊ खराटे या तिघांनीही फिर्यादी, त्यांची आई व मुलगी यांना रस्त्यावर गाठून अश्लील शिवीगाळ केली आणि तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार दिलीप तडवी हे करत आहेत.
शेगाव: तालुक्यातील अळसणा गावात एकाच समाजातील आणि एकाच गल्लीत राहणाऱ्या दोन तरुणांमध्ये पूर्ववैमनस्यातून आणि रमजान ईदच्या जेवणाला न गेल्याच्या कारणावरून रक्तरंजित संघर्ष झाला. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परांविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फिर्यादी राहील बेग इम्रान बेग (वय २० वर्षे रा. अळसणा, ता. शेगाव, जि. बुलढाणा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २४ मे २०२६ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ते आपल्या घरासमोर उभे होते. त्याच वेळी गावातील आरोपी जाहेद खान शकील खान (वय २१ वर्षे) हा राहील बेग यांच्या लहान भाऊ अफान बेग इम्रान बेग याला विनाकारण लोटपाट व मारहाण करत होता. राहील बेग हा धावत जाऊन भांडण सोडवत असताना, आरोपी जाहेद खान याने आपल्या खिशातून एक लोखंडी कटर काढले आणि अफान बेग याच्या उजव्या हाताच्या तळहातावर कटरने सपासप वार केले. राहील बेग आपल्या भावाला वाचवण्यासाठी मध्ये पडला असता, आरोपी जाहेद खानने राहीलच्या डाव्या हाताच्या मनगटाच्या वर लोखंडी कटरने जोरदार वार केला. यामध्ये राहील जखमी झाला. याप्रकरणी राहील बेग यांच्यातक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार अनिल बरींगे हे करत आहेत. तर जाहेद खान शकील खान (वय २१ वर्षे) रा. अळसणा, ता. शेगाव, जि. बुलढाणा याने दिलेल्या प्रति-फिर्यादनुसार २४ मे २०२६ रोजी रात्री ९.३० वाजता तो आपल्या घरासमोर शांत उभा होता. त्यावेळी गावात काही लोकांमध्ये भांडण सुरू होते. तेवढ्यात तिथे आरोपी राहील बेग इम्रान बेग याने धावत येऊन जाहेदला तू सुद्धा त्या भांडणामध्ये सामील होतास, असे म्हटले. जाहेद खानने तू माझे नाव विनाकारण भांडणात का घेतो आहेस?, मी कोणतीही हाणामारी करत नाहीये, मी दुर उभा आहे, असे उत्तर देताच राहील बेग लोखंडी आसारी उचलून जाहेद खानच्या डोक्यात मारली. याप्रकरणी जाहेद खानच्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी राहील बेग विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार अनिल बरींगे हे करत आहेत.
पिंपळगाव राजा: खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या कुंबेफळ झोपडपट्टी परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि महिला सुरक्षेचा प्रश्न वेशीवर टांगणारी घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय विवाहितेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करण्यात आल्याची आणि तिच्या कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
फिर्यादी महिल (वय २४ वर्षे) रा. कुंबेफळ झोपडपट्टी, ता. खामगाव हिने दिलेल्या तक्रारीनुसार, २४ मे २०२६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ती आपल्या घरात दोन लहान मुलांसह दरवाजा ओढून झोपलेली होती. मुले गाढ झोपेत असताना, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शेजारी राहणारा आरोपी रघु (वय २५ वर्षे) रा. कुंबेफळ झोपडपट्टी हा चोरट्या पावलांनी घराच्या आत शिरला. खाटेवर झोपलेल्या पीडितेजवळ जाऊन अतिशय वाईट उद्देशाने तिच्या अंगावरील सलवार ओढली. अचानक अंगाला स्पर्श झाल्याने व ओढाताण झाल्याने पीडितेला जाग आली आणि ती ओरडली. त्यामुळे आरोपी घरातून पळून गेला. पहाटेच्या सुमारास पिडीत महिलेने धीर धरून आपल्या सख्ख्या भावाला फोन लावला आणि रात्री घडलेला सर्व लाजिरवाणा प्रकार रडून सांगितला. भाऊ शेख नदीम आणि शेख राजीक आरोपी रघुकडे गेले. रघु हा त्याचे मित्र गौरव आणि विशाल यांच्यासह उभा असताना, शेख नदीम याने मेरे बहन को क्यु छेडा?, असे विचारताच रघु, गौरव आणि विशाल याने शेख नदीम आणि शेख राजीक यांना मारहाण केली. याप्रकरणी
पिंपळगाव राजा पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ३३३, ११५(२), ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील पोलीस अंमलदार एकनाथ खांदे करत आहेत. या चारही घटनांमुळे ग्रामीण भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
