दोन मातांच्या मृत्यूचे गूढ सीसीटीव्हीतून उलगडणार?; प्रसूतीनंतर नेमकी कोणती उपचार प्रक्रिया झाली; आता रुग्णालयातील फुटेजकडे सर्वांचे लक्ष

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीदरम्यान दोन तरुण मातांचा झालेला मृत्यू आता गंभीर वळणावर पोहोचला असून, संपूर्ण घटनेमागील सत्य बाहेर आणण्यासाठी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रसूतीनंतर संबंधित महिलांची प्रकृती नेमकी कशी बिघडली, त्यांच्यावर कोणते उपचार करण्यात आले, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी कितपत तत्परता दाखविली, तसेच उपचार प्रक्रियेत कुठे हलगर्जीपणा झाला का, याचा उलगडा आता सीसीटीव्ही फुटेजमधून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दोन्ही महिलांची प्रसूती उपजिल्हा रुग्णालयात पार पडली. नवजात बालके सुखरूप असल्याचे सांगितले जात असताना, प्रसूतीनंतर मातांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना बुलढाणा येथे रेफर करण्यात आले. मात्र उपचारासाठी नेत असतानाच दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. घटनेच्या कालावधीत डॉक्टरांनी कोणत्या तपासण्या केल्या, आवश्यक वैद्यकीय प्रोटोकॉल पाळले गेले का, वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळेत माहिती देण्यात आली होती का, तसेच रुग्णांची प्रकृती गंभीर असताना उपचार प्रक्रियेत विलंब झाला का, याबाबत आता नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये प्रसूती कक्षाबाहेरील हालचाली, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, तसेच रुग्णांना हलविण्याची संपूर्ण प्रक्रिया कैद झालेली असण्याची शक्यता आहे.

यामुळे “खरे साक्षीदार” म्हणून आता सीसीटीव्ही फुटेजकडे पाहिले जात असून, या फुटेजची निष्पक्ष तपासणी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. काही नागरिकांनी तर संबंधित फुटेज तातडीने जप्त करून स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही केली आहे. संभाव्य त्रुटी किंवा हलगर्जीपणा लपविण्यासाठी पुरावे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने फुटेज सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

दरम्यान, प्रशासन केवळ तात्पुरत्या कारवाईवर समाधान मानणार की या घटनेतील प्रत्येक पैलू तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. दोन निष्पाप मातांचा मृत्यू हा केवळ वैद्यकीय अपघात होता की उपचार प्रक्रियेतील गंभीर हलगर्जीपणाचा परिणाम, याचे उत्तर आता सीसीटीव्ही फुटेजमधूनच समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“सीसीटीव्ही कॅमेरे खोटं बोलत नाहीत”

मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातील दोन मातांच्या मृत्यू प्रकरणात आता सीसीटीव्ही फुटेज सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो, अशी चर्चा शहरात सुरू आहे. प्रसूतीनंतरच्या काही तासांत डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी आणि वैद्यकीय यंत्रणेची हालचाल नेमकी कशी होती, रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले का, तसेच रेफर करण्यापूर्वी कोणती प्रक्रिया पार पडली, याचे महत्त्वाचे धागेदोरे फुटेजमधून समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित सीसीटीव्ही फुटेज तातडीने जप्त करून त्याची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!