बुलढाणा जिल्हा क्राईम डायरी: शेगावात धावत्या बसमध्ये चोरी, तर खामगाव व मोताळा तालुक्यात हाणामारीच्या थरारक घटना; ४ गुन्हे दाखल!

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्हाभरातून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या काही खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. शेगाव येथील गजबजलेल्या बसस्थानकावर एका वृद्ध महिलेचे दागिने लंपास झाल्याची घटना ताजी असतानाच, खामगाव शहर, धामणगाव बढे आणि पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत किरकोळ वादातून गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

शेगाव बसस्थानकावर वृद्ध महिलेची सोन्याची पोत लंपास!

शेगाव: येथील अत्यंत गजबजलेल्या एसटी बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली आहे.

निपाणा (ता.खामगाव जि.बुलढाणा) येथील रहिवासी असलेल्या कलमाबाई श्रीकृष्ण भटकर (वय ६५ वर्षे) या २३ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शेगाव बसस्थानकावरून बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात आरोपीने त्यांच्या गळ्यातील ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेडॉल (किंमत ९ हजार रुपये) आणि ४ ग्रॅम वजनाचे जुने चौकोनी सोन्याचे मणी (किंमत १२ हजार रुपये), अशी एकूण २१ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत मोठ्या शिताफीने चोरून नेली. याप्रकरणी २८ मे रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार श्याम आघाव हे करत आहेत.

खामगाव शहरात मजुराला भररस्त्यात दगड मारून जखमी केले!

खामगाव: येथील मोहन चौकात कामाच्या शोधात आलेल्या एका ५० वर्षीय मजुराला तुमच्या गावात कामधंदा नाही का?, असे म्हणून अमानुष मारहाण करण्यात आली.

८ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता फिर्यादी गजानन त्र्यंबक रत्नपारखी (वय ५० वर्षे) रा. शेलोडी (ता. खामगाव) हे मजुरीचे काम शोधण्यासाठी मोहन चौकात भोसले ज्वेलर्स दुकानाच्या बाजूला आले होते. तिथे आरोपी संतोष काशीराम भारसाकळे (वय ४० वर्षे) रा. दालफैल, बावणे चक्कीजवळ, (खामगाव) याने त्यांना हटकले व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने प्रतिकार केला असता, आरोपीने जमिनीवर पडलेला दगड उचलून थेट गजानन यांच्या डोक्यात मारला. यात ते गंभीर जखमी झाले. घटनास्थळावर उपस्थित रवी जयरामदास पंजवाणी यांनी जखमीला तातडीने सामान्य रुग्णालय, खामगाव येथे उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी गजानन रत्नपारखी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ग्रेड पोउपनी दीपक इलामे हे करत आहेत.

धामणगाव बढे येथे शेजाऱ्यांचा धुमाकूळ; महिलांची छेडछाड व बेदम मारहाण!

धामणगाव बढे: येथे शेजाऱ्यांच्या वादातून महिलांचा विनयभंग करत त्यांना दगडाने मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

२८ मे २०२६ रोजी संध्याकाळी ७:०० वाजता आरोपी परशराम जाधव हा मोहल्ल्यात विनाकारण शिवीगाळ करत होता. धामणगाव बढे (ता.मोताळा) येथील रहिवासी असलेले एकनाथ हरी गोरे (वय ५३ वर्षे) यांच्या बहिणीने आणि पत्नीने त्याला जाब विचारला असता, आरोपीने संतापून हातात दगड घेऊन त्या दोघींच्या डोक्यात मारला. इतकेच नव्हे, तर अत्यंत अश्लील शिवीगाळ करत लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव केले. फिर्यादी एकनाथ गोरे हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता, आरोपी क्र. २ रंजना जाधव हिने त्यांना चापटबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकनाथ गोरे यांनी धामणगाव बढे पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी परशराम शिवराम जाधव, रंजना परशराम जाधव (दोन्ही रा. धामणगाव बढे) यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५(२), ७९, २९६, ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास एएसआय सुरेश सोनवणे करत आहेत.

पिंपळगाव राजा हद्दीत ‘बेवडा’ म्हटल्याच्या वादातून लोखंडी पाईपने हल्ला!

पिंपळगाव राजा: वडजी भेंडी गावात किरकोळ टोमण्यावरून वाद उफाळला आणि त्याचे रूपांतर थेट प्राणघातक हल्ल्यात झाले. तीन जणांनी मिळून एका तरुण शेतकऱ्यावर आणि त्याच्या आईवर हत्याराने हल्ला केला.

वडजी भेंडी (ता.खामगाव) येथील रहिवासी असलेले निवृत्ती गोपाल बोदडे (वय २९ वर्षे) हे २८ मे २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता दूध डेअरीतून घरी परतत असताना आरोपी कुणाल गुलाबराव हाडे याने त्यांना ‘बेवडा’ म्हटले. निवृत्ती यांनी ही माहिती कुणालच्या आईला दिली. याचा राग धरून आरोपी गुलाबराव वासुदेव हाडे याने फिर्यादीच्या आईला शिवीगाळ केली. वाद वाढल्याने कुणाल याने निवृत्तीच्या डोक्यावर लोखंडी पाईप मारला, तर गुलाबराव याने धारदार अवजाराने वार करून आईला जखमी केले. तिसरा आरोपी वैभव गुलाबराव हाडे याने पाठीमागून बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार एकनाथ खांदे हे करीत आहेत.

जिल्ह्यात वाढत्या वादाच्या आणि चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना महिलांनी आपल्या दागिन्यांची काळजी घ्यावी आणि कोणत्याही किरकोळ वादाला हिंसक वळण न देता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!