अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणांहून चार व्यक्ती गूढरित्या बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये तीन महिला (ज्यात एका ज्येष्ठ महिलेचा समावेश आहे) आणि एका नऊ वर्षांच्या लहान मुलीचा समावेश आहे. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये रीतसर ‘मिसिंग’च्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
मलकापूर: आपल्या मुलीच्या घरी पाहुण्या म्हणून आलेल्या एक ज्येष्ठ महिला मलकापूर येथील शिवाजी नगर परिसरातून अचानक बेपत्ता झाल्या. त्या घरातून कोठेतरी निघून गेल्या असून नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही त्या मिळून आलेल्या नाहीत. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
शेगाव ग्रामीण: पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिंचखेड (ता.शेगाव) येथून एक विवाहित महिला घरून बाहेर पडल्यानंतर परतल्याच नाहीत. कौटुंबिक कारणावरून रागाच्या भरात त्या निघून गेल्याचा प्राथमिक अंदाज असून, उशिरापर्यंत शोध घेऊनही त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
बुलढाणा ग्रामीण: पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देउळघाट परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून, कौटुंबिक वादानंतर एक महिला तिच्या नऊ वर्षांच्या लहान मुलीला सोबत घेऊन घरातून निघून गेली आहे. गावात आणि नातेवाईकांकडे शोध घेऊनही अद्याप मायलेकींचा कुठेही ठावठिकाणा लागलेला नाही. याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
