‘चिल्ड्रन बँक’च्या नोटांवर कोट्याधीश बनवण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या महाठगांचा पोलिसांनी वाजवला बँड! मलकापुरात हायव्होल्टेज कारवाई!

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): पैशांच्या हव्यासापोटी गुन्हेगारीची कोणती पातळी गाठली जाऊ शकते, याचा संतापजनक नमुना मलकापुरात समोर आला आहे! हैदराबादवरून बोलावून लोकांना लाखोंचा चुना लावू पाहणाऱ्या दोन अट्टल ठगांचा मलकापूर पोलिसांनी अत्यंत आक्रमक आणि फिल्मी स्टाईलने पर्दाफाश केला आहे. ‘३५ हजार द्या आणि साडेतीन लाख न्या’ असे आमिष दाखवून लूटमार करण्याचा या भामट्यांचा डाव पोलिसांनी पार उधळून लावला.

मलकापूरच्या गोपाळकृष्णनगर भागात आज १६ जून रोजी एका मोठ्या लुटीची तयारी सुरू होती. हैदराबाद येथील दोन इसमांना ३५ हजार रुपयांच्या बदल्यात ३ लाख ५० हजार रुपये देतो’ अशी मोठी भूलथाप मारण्यात आली होती. या निष्पाप लोकांना मलकापूर येथे बोलावून त्यांना लुटण्याचा पूर्ण प्लॅन या टोळीने आखला होता. मात्र, मलकापूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाला याची आधीच कुणकुण लागली आणि पोलिसांनी त्या ठिकाणी वेढा टाकला.

पोलिसांनी दबा धरून बसून योग्य वेळी झडप घातली आणि ईश्वर अशोक मेसरे (वय ३४ वर्षे) रा. नरवेल, ता. मलकापूर, जि. बुलढाणा (ह.मु. यशोधाम कॉलनी, मलकापूर), गौतम मुकुंदा तायडे (वय २२ वर्षे) रा. रमाईनगर, मलकापूर, ता. मलकापूर, जि. बुलढाणा या दोन इसमांना जागीच रंगेहात दबोचले. पोलिसांनी या ठगांची कसून झडती घेतली असता, वरच्या बाजूला भारतीय चलनातील ५०० रुपयांची अवघी १ खरी नोट ठेवून लोकांना फसवण्यासाठी त्याखाली लहान मुलांच्या खेळण्यातील ‘चिल्ड्रन बँक’ लिहिलेल्या तब्बल ६९९ नोटा लपवल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून भारतीय चलनातील ५०० रुपयांची १ खरी नोट, चिल्ड्रन्स बँकेच्या ५०० रुपयांच्या ६९९ बनावट नोटा, गुन्ह्यात वापरलेली एक पांढऱ्या रंगाची जुपिटर दुचाकी गाडी, ओपो, रियल मी, ऑनर आणि ओपो ए५७ कंपनीचे एकूण ४ अँड्रॉइड मोबाईल फोन, असा एकूण ९५ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतिश बेले यांच्याकडे सोपवण्यात आला असून, या टोळीचे धागेदोरे आणखी कुठे पसरले आहेत का, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

‘या’ पोलिसांनी केला गेम खल्लास!

ही धडक आणि कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या आदेशाने मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे, पोलीस अंमलदार आसिफ शेख, नवल राठोड, गणेश बर्डे, संतोष कुमावत, योगेश तायडे, प्रविण गवई आणि दिपक सोनोने यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!