जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र; प्राणघातक हल्ले, दरोडा, डिझेल चोरीसह ४ जण बेपत्ता

अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत खळबळजनक २४ तास राहिले आहेत. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कुऱ्हाडीने जीवघेणे हल्ले, तलवारी-लाठ्यांसह सशस्त्र दरोडा, डिझेल चोरी आणि भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याच काळात जिल्हाभरातून चार तरुणी व महिला बेपत्ता झाल्याच्या नोंदी पोलीस दप्तरी झाल्या आहेत.
दारूच्या वादातून कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; खामगाव आणि शेगावात थरार
खामगाव शहर: खामगाव जवळील वाडी परिसरात दारू पिण्याच्या कारणावरून मंगेश भानुदास खोंड (वय ३० वर्षे) याने नागेश मधुकर जवंजाळ यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने प्राणघातक वार केला. नागेश गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनी संदीप गोंडाने हे करत आहेत.
शेगाव शहर: ‘वॉर्ड मेंबर काम करत नाही’ या वादातून ८ जणांच्या टोळक्याने शेख अरबाज शेख बिसमिल्ला (वय २८) यांना घेरले. आरोपी तैफुरशहा याने त्यांच्यावर दगडफेक केली, तर वाजीदशहा याने पाठीत चाकू खुपसून गंभीर जखमी केले. शेगाव पोलिसांनी ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
एमआयडीसी मलकापूर: तांदुळवाडी शिवारातील धरणावर मासे पकडण्यास विरोध केल्याने म्हैसवाडी येथील ४ अज्ञात इसमांनी विनोद देवीदास धायडे (वय ४४) यांना काठीने बेदम मारहाण करून जखमी केले.
साकेगाव येथे २४ जणांचा सशस्त्र दरोडा; नांदुऱ्यात डिझेलची चोरी
रायपूर (साकेगाव): लहान मुलांच्या भांडणाच्या जुन्या वादावरून साकेगाव येथील पारधी समाजाच्या २४ जणांच्या सशस्त्र टोळक्याने शांताबाई वामन जाधव (वय ७५ वर्षे) यांच्या घरात घुसून लाठ्या-काठ्यांनी धुमाकूळ घातला. या झटापटीत शांताबाई आणि त्यांच्या सुनेला बेदम मारहाण करण्यात आली. घरातील सामान अस्ताव्यस्त करून ५७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि पेरणीसाठी ठेवलेले ४८ हजार रुपये रोख लांबवण्यात आले. रायपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 नांदुरा: ग्राम वडी जवळील इंडियन पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या सोळा चाकी ट्रकच्या टाकीतून अज्ञात चोरांनी २९ हजार ९४० रुपये किमतीचे ३०० लिटर डिझेल लंपास केले.
जिल्ह्यातून चार जण बेपत्ता; पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल
देऊळगाव राजा: सोनोशी येथील २१ वर्षीय तरुणी (बी. फार्मसी प्रथम वर्ष) १५ जून रोजी सकाळी समर्थ कॉलेजच्या गेटवर सोडल्यापासून नेहमीप्रमाणे संध्याकाळी घरी परतली नाही. ती गुलाबी शर्ट आणि निळी पॅन्ट अशा कॉलेज गणवेशात होती.
खामगाव ग्रामीण: अंबिकापूर येथील इयत्ता १२ वीत शिकणारी १८ वर्षे ११ महिन्यांची मुलगी १५ जून रोजी रात्री घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. तिच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर ‘P’ असे नाव गोंधलेले आहे.
मलकापूर शहर: वडनेर भोलजी येथील २१ वर्षीय विवाहित महिला तिच्या २ वर्षांच्या चिमुरड्या मुलासह भुसावळला जाण्यासाठी मलकापूर बसस्थानकावर आली होती. बसमध्ये बसवून दिल्यानंतरही ती सासरी पोहोचली नाही. मायलेक दोघेही बेपत्ता आहेत.
धामणगाव बढे: कोल्ही गोलर येथील एक २० वर्षीय तरुणी १६ जून रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास तिच्या काकूच्या घरातून अचानक बेपत्ता झाली आहे.
भीषण अपघात आणि प्रतिबंधित गुटखा जप्त
जलंब (आंबोडा): नांदुरा-खामगाव हायवेवरील जिओ पेट्रोल पंपाजवळ एका भरधाव कंटेनरने निष्काळजीपणे चालवून दुसऱ्या वाहनाला भीषण धडक दिली. या अपघातात चालक राजविंदरसिंग काश्मीरसिंग (वय २८ वर्षे) रा. पंजाब यांचा मृत्यू झाला.
बोराखेडी (मोताळा): अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी इब्राहिमपूर येथे छापा टाकून राहुल लाटे आणि अमोल लाटे यांच्याकडून प्रतिबंधित केलेला पान बहार, नजर पानमसाला, जर्दा आणि तब्बल १२९० स्क्रॅच कार्ड जप्त केले असून अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!