बुलढाणा जिल्हा गुन्हेगारी वृत्त: हिट अँड रन, हाणामारी आणि घरफोडी

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत विविध पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये रस्ते अपघात, चोरी, शासकीय कर्मचाऱ्यांना धमकावणे, सरकारी इमारतीला आग लावणे, हाणामारी आणि मोठ्या प्रमाणावर अवैध साठा जप्त केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पोलीस सर्व प्रकरणांचा कसून तपास करत आहेत.

तहसील कार्यालयाच्या मुख्य गेटला आग लावण्याचा प्रयत्न

खामगाव: येथील तहसील कार्यालयाच्या शासकीय इमारतीच्या मुख्य गेटवर दोन अज्ञात इसमांनी ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा सर्व प्रकार कार्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून, नायब नाझर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रस्ते अपघात आणि हिट अँड रन

खामगाव ग्रामीण: नॅशनल हायवे क्र. ५३ वर विजय वानखडे (वय ३५ वर्षे) हे आपल्या दुचाकीने जात असताना एका अज्ञात सुसाट वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात केल्यानंतर आरोपी चालक वाहन घेऊन पसार झाला.

जलंब: आंबोडा जवळील जिओ पेट्रोल पंपापाशी एका कंटेनर चालकाने आपले वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून पंजाबमधील एका चालकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

कर्तव्यावर असलेल्या तलाठ्याला धमकी

धाड: सातगाव म्हसला सज्जा अंतर्गत धामणा नदी पात्रात पाईपलाईन तुटल्याचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला आरोपींनी त्यांच्या सांगण्यानुसार पंचनामा करण्यासाठी दबाव टाकला. तलाठ्याने नकार दिला असता, आरोपींनी त्यांना आई-बहिणीवरून अश्लील शिवीगाळ करत ‘चिरून टाकण्याची’ जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी ३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिल्लत नगर येथे हाणामारीचे परस्पर गुन्हे

मलकापूर: मिल्लत नगर भागात दोन गटात झालेल्या वादातून परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. पहिल्या तक्रारीनुसार, बांधकामाच्या साहित्यावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला चार जणांनी मिळून फायटर आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या बाजूने दाखल झालेल्या क्रॉस तक्रारीत, जुन्या वादावरून आणि बदनामी करण्याच्या उद्देशातून एका तरुणाला लाकडी काठीने आणि चापटबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लाखो रुपयांची घरफोडी

एमआयडीसी दसरखेड: तालसवाडा (ता.मलकापूर) येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील लोखंडी लॉकरमधून सोन्याचे दागिने (पोत, अंगठी, कानातले) आणि नगदी ५ हजार रुपये, असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

विवाहितेचा विनयभंग व कौटुंबिक हिंसाचार

धमणगांव बढे: टेंभी जहागीरपूर येथे एका विवाहितेची बदनामी करून, वाईट उद्देशाने तिचा हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी पतीच्या मित्रावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच या वादात पतीनेही विवाहितेला चापटबुक्क्यांनी मारहाण करून घरातून हाकलून दिल्याचा गंभीर आरोप आहे.

अवैध जुगारावर छापा

खामगाव ग्रामीण: बोरीअडगाव येथे बीएसएनएल टॉवर जवळील सार्वजनिक जागेत वरली मटका जुगार खेळत असलेल्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून मटक्याच्या चिठ्ठ्या आणि नगदी रोकड जप्त करण्यात आली आहे.

जिल्ह्यातून महिला बेपत्ता

मेहकर व शिवाजीनगर: जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारींची नोंद झाली आहे. मेहकर बस स्टँड: एक २२ वर्षीय महिला तिच्या अडीच वर्षांच्या लहान मुलीला सोबत घेऊन दवाखान्यात जाण्याच्या बहाण्याने आली असता, बस स्थानकावरून अचानक बेपत्ता झाली. नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही. शिवाजीनगर (सुटाळा): राजेश्वर नगर भागातून एक २५ वर्षीय महिला कोणालाही काहीही न सांगता घरून निघून गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!