अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या दोन दिवसांत गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये मलकापूर येथे विवाहीतेचा कौटुंबिक छळ, धामणगाव बढे अंतर्गत विनयभंग व पाईपलाईनच्या वादातून दांपत्याला मारहाण, बुलढाण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन, तर धाड येथे शासकीय प्रभार न सोपवणाऱ्या सचिवासह जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मलकापूर येथून एक ५१ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाली आहे.
मलकापूर शहर: रोशनी प्रशांत सोनवणे (वय २५ वर्षे) रा.भीमनगर, मलकापूर यांचा विवाह प्रशांत अंबादास सोनवणे (वय ३० वर्षे) याच्याशी झाला होता. लग्नानंतर पतीला भडकावून देत, माहेरहून गाडी घेण्यासाठी १ लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला नांदवणार नाही व काडीमोड देईल, अशी धमकी देऊन पती दारू पिऊन फिर्यादीला मारहाण करायचा. सासू कस्तुरा अंबादास सोनवणे (वय ६० वर्षे), सासरा अंबादास त्र्यंबक सोनवणे (वय ६२ वर्षे) सर्व रा. मिरा रोड, भाईंदर, मुंबई हे पतीला भडकावून शिवीगाळ करत शारीरिक-मानसिक त्रास देत होते. या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोउपनि प्रशांत झेंडगे करत आहेत.
मलकापूर शहर: शिवाजीनगर, (मलकापूर) येथील प्रमोद भिकाजी चोपडे (वय ५१ वर्षे) रंग निमगोरा, केस काळे-पांढरे, उंची ५ फूट ६ इंच. अंगात पांढरा शर्ट, कथ्था रंगाची पँट आणि पायात साधी चप्पल हे १७ जून रोजी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले. नातेवाईक व मित्रांकडे शोध घेऊनही ते मिळून आले नाहीत. याप्रकरणी मलकापूर पोलीस ठाण्यात मिसींग दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस अंमलदार निबांळकर हे करत आहेत.
धामणगाव बढे: कोल्ही गोलर (ता. मोताळा) येथील फिर्यादी महिला अंघोळ करून घरात जात असताना, आरोपी राहुल याने पाठीमागून येऊन तिचे तोंड दाबले व वाईट उद्देशाने मिठीत ओढले. महिलेने आरडाओरडा केल्यावर आरोपी पळाला. या घटनेचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी आरोपीच्या घरी गेली असता, आरोपीच्या कुटुंबीयांनी (मनीषा, मानसिंग आणि कमलबाई) फिर्यादीलाच शिवीगाळ करून तुला व तुझ्या पतीला जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस अंमलदार राजेंद्र राणे हे करत आहेत.
धामणगाव बढे: नळकुंड (ता. मोताळा) येथील मनिषा संजय चव्हाण यांच्या पतीने ई-क्लास जमिनीतून आरोपी अरुण रघुनाथ सपकाळ (वय ३४ वर्षे) रा. नळकुंड याच्या शेतातून पाण्याची पाईपलाईन टाकली होती. आरोपी अरुण हा जेसीबीने नाली करत असताना पाईपलाईन फुटली. फिर्यादीने जाब विचारला असता, जमीन आमच्या बापाची आहे, असे म्हणून आरोपीने फिर्यादीच्या गालात चापट मारली, हात पकडून खाली पाडले आणि विनयभंग केला. फिर्यादीचे पती वाचवायला आले असता आरोपीने त्यांना काठीने व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी दांपत्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस अंमलदार गजानन पाटील हे करत आहेत.
बुलढाणा शहर: शेतकरी नेते रविकांत तुपकर हे कर्जमाफीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी आणि सन २०२४-२५ चा पीक विमा मिळण्यासाठी श्रीमती शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात विनापरवाना ठिय्या आंदोलन केले. जिल्ह्यात १४ ते २८ जून दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांचे जमाबंदी आदेश (कलम ३७(१)(३)) लागू असतानाही शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीमती शर्वरी रविकांत तुपकर, राधा नंदकुमार तुपकर, अमोल मोरे, विनायक सरनाईक, कार्तिक खेडेकर, आकाश माळोदे, नितीन राजपूत, राहुल शेलार आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे इतर १० ते १५ कार्यकर्ते यांच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोउपनि सुषमा पाटील ह्या करत आहेत.
धाड: लोकसेवक असलेले सचिव रवींद्र बोबडे यांची ग्रामपंचायत धाड येथून माळविहीर येथे प्रशासकीय बदली झाली होती. बदली झाल्यानंतर शासकीय नियमांनुसार नवनियुक्त सचिवाला ग्रामपंचायतीचा प्रभार व शासकीय दप्तर (अभिलेख) देणे आवश्यक होते, परंतु त्यांनी प्रभार दिला नाही. तसेच आरटीआय अंतर्गत ३० दिवसांत माहिती पुरवली नाही. या प्रकरणी अरविंद गोविंदराव टेकाळे (विस्तार अधिकारी, पंचायत समिती बुलढाणा) यांच्या फिर्यादीवरून आरोपी रवींद्र किसनराव बोबडे (वय ३५ वर्षे) तत्कालीन सचिव, ग्रामपंचायत धाड यांच्याविरुद्ध गटविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम ४, ५, ९ अभिलेख अधिनियम २००५ व माहिती अधिकार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण हे करत आहेत.
