अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): गेल्या काही दिवसांत बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारी, कौटुंबिक व शेजारील वाद, रस्ते अपघात आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. किरकोळ कारणांवरून लाठ्या-काठ्या आणि कुऱ्हाडीने थेट जीवघेणे हल्ले करण्याच्या प्रवृत्तीत वाढ झाल्याचे चित्र समोर येत आहे. यासोबतच जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतून तरुण मुली व महिला बेपत्ता होण्याचे सत्र सुरू असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मलकापूर शहरातील अवैध वृक्षतोडीच्या प्रकरणाने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले असून संपूर्ण जिल्हाभरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणारा हा सविस्तर वृत्तांत.
नगरपालिकेच्या आशीर्वादाने झाडांची कत्तल? मलकापुरात तीव्र संताप
विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरातून पर्यावरणाचा -हास करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील चाळीसबिघा परिसरातील गार्डनच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर झाडांची अवैध कत्तल सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात काही झाडे मुळासकट उपटून टाकण्यात आली आहेत, तर काही झाडांची अर्धवट छाटणी करून ती पुढील तोडीसाठी तयार ठेवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, एकीकडे शासन पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा देत वृक्षलागवडीवर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे शहराच्या मध्यवस्तीत अशी वृक्षतोड सुरू आहे. ही वृक्षतोड थेट नगरपालिकेच्या आशीर्वादाने आणि संगनमताने होत असल्याचा संतापजनक आरोप स्थानिकांनी केला आहे. या वृक्षतोडीला अधिकृत परवानगी कोणी दिली? संबंधित वन विभाग किंवा नगर परिषद प्रशासनाने या जागेची पाहणी केली आहे का? पर्यावरणाची हानी करणाऱ्या या भूमाफियांवर आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणार की “वृक्ष वाचवा”च्या घोषणा केवळ कागदावरच राहणार, असा संतप्त सवाल मलकापूरवासीय विचारत आहेत.
पाइपलाइन फुटल्याच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला
धामणगाव बढे: मोताळा तालुक्यातील नळकुंड शेत शिवारात एक थरारक घटना घडली. शेतात जेसीबीने नाली खोदण्याचे काम सुरू असताना एका शेतकऱ्याची पाण्याची पाइपलाइन अचानक फुटली. फिर्यादीने प्रामाणिकपणे आरोपीला फोन करून ‘तुमची पाइपलाइन फुटली असून मी ती दुरुस्त करून देतो’ असे सांगितले. मात्र, याचा राग अनावर झाल्याने आरोपींनी हातात कुऱ्हाड आणि लाकडी काठी घेऊन घटनास्थळ गाठले. तिथे उलट्या कुऱ्हाडीने फिर्यादीच्या छातीवर, तोंडावर आणि हातावर सपासप वार केले, तर दुसऱ्या आरोपीने काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या यला विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मोबाईलमधील फोटोवरून वाद आणि मारहाण
नांदुरा: नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे एका महिलेच्या पतीवर आणि तिच्यावर गावातल्याच काही व्यक्तींनी लाकडी काठीने हल्ला केला. “तुमच्या पतीने माझ्या आईचा फोटो मोबाईलमध्ये का काढला?” असा जाब विचारत आरोपीने घरात घुसून वाद घातला. कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता आरोपीने फिर्यादी महिला व तिच्या पतीला काठीने बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. नांदुरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ताडपत्री टाकण्यावरून वृद्धाला मारहाण
जळगाव जामोद: जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बुद्रुक येथे पावसाचे पाणी घरात येऊ नये म्हणून ताडपत्री (पावसाळी कागद) टाकण्याच्या किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमध्ये जुंपली. ८५ वर्षीय बौद्ध वृद्ध शेतकऱ्याने आरोप केला की, जागेच्या वादावरून आरोपीने त्यांना लाकडी पट्टीने मारून जखमी केले. तर याच प्रकरणात ५० वर्षीय धनगर समाजाच्या व्यक्तीने उलट तक्रार दिली की, ते आपल्या घराच्या छतावर ताडपत्री टाकत असताना ८५ वर्षीय वृद्धाने “ही जागा माझी आहे, इथे कागद टाकू नको” असे म्हणून त्यांना काठीने गालावर व हातावर मारहाण केली. पोलिसांनी या दोन्ही परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल केले असून तपास सुरू केला आहे.
कपडे वाळत घालण्यावरून शेजाऱ्यांमध्ये जातीय तेढ
रायपूर: रायपूर गावात शेजारी राहणाऱ्या दोन वेगवेगळ्या समाजाच्या कुटुंबांमध्ये कपडे वाळत घालण्याच्या कारणावरून मोठा वाद झाला. एका महिलेने घरासमोरील दारात धुतलेले कपडे वाळत घातले असता, शेजारी राहणाऱ्या मुस्लिम दांपत्याने तिथे येऊन “इथे कपडे वाळत घालायचे नाहीत” असे म्हणून अश्लील शिवीगाळ केली आणि “तुझी जागा मला दे, नाहीतर तुला व तुझ्या नवऱ्याला मारून टाकीन” अशी धमकी दिली.
याच्या उलट, दुसऱ्या बाजूने अशी तक्रार देण्यात आली की, सदर महिलेने उलट त्यांच्या घरासमोर येऊन विनाकारण शिवीगाळ केली आणि “तुमची मुले बाहेर दिसली तर त्यांचा गळा दाबून जीव घेईन,” अशी धमकी दिली. रायपूर पोलिसांनी या दोन्ही बाजूंनी एनसी दाखल केली आहे.
जुन्या वादातून डोक्यात कड्याने प्रहार
मलकापूर शहर: मलकापूर शहरातील माता महाकाली नगर परिसरात एका २० वर्षीय तरुणावर चार जणांनी मिळून हल्ला केला. “गणपतीच्या उत्सवात आम्ही तुमच्या गल्लीत आलो होतो, तेव्हा तू आमच्या अंगावर मारण्यासाठी का आला होतास?” असा जुना राग मनात धरून आरोपींनी तरुणाला गाठले. एका आरोपीने त्याच्या डोक्यात लोखंडी कड्याने जोरदार प्रहार केला, तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पोटावर गंभीर जखमा केल्या. मलकापूर शहर पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
दुचाकी चालवण्याच्या कारणावरून महिलेला घरातून फरफटत आणले
मलकापूर ग्रामीण: नांदुरा तालुक्यातील शिरसोडी येथील एका ४० वर्षीय महिलेला तिच्याच गावात राहणाऱ्या एका इसमाने अश्लील शिवीगाळ करत घराबाहेर फरफटत आणल्याची संतापजनक घटना घडली. “तुझा मुलगा माझ्या पत्नीच्या नावावर असलेली मोटारसायकल का चालवतो?” असा अजब जाब विचारत आरोपीने या महिलेशी वाद घातला. महिलेने ‘मुलगा आल्यावर त्याला समजावून सांगते’ असे म्हटले तरीही आरोपीने तिचा हात धरून तिला घराबाहेर ओढले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
शेगाव ग्रामीण: कारच्या धडकेत ५३ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू
शेगाव ते खामगाव रोडवर माउली वॉटर पार्कच्या पुढे एका पांढऱ्या रंगाच्या ‘स्विफ्ट डिझायर’ कार चालकाने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला अत्यंत वेगात आणि निष्काळजीपणे चालवून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ५३ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघात घडल्यानंतर कार चालक जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न देता किंवा पोलिसांना माहिती न देता कारसह घटनास्थळावरून पळून गेला. शेगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
धाड: धाड जवळील गायत्री पेट्रोल पंपाजवळ एका १९ वर्षीय तरुणाच्या दुचाकीला अज्ञात दुचाकीस्वाराने जोरात धडक दिली. या अपघातात तरुण आणि त्याच्यासोबत असणारी त्याची आई गंभीर जखमी झाले. अपघात करून आरोपी दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला. धाड पोलिसांनी याप्रकरणी मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव जामोद: अकोला खुर्द येथील एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी शेतात जात असताना, एका २० वर्षीय तरुणाने तिचा पाठलाग केला. “तू मला खूप आवडतेस, मला तुझ्याशी संबंध ठेवून लग्न करायचे आहे,” असे म्हणून त्याने जाहीरपणे तिचा हात धरून विनयभंग केला व तिच्या मनात लज्जा उत्पन्न केली. पीडितेच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मलकापूर ग्रामीण: उमाळी गावामध्ये एक १९ वर्षीय तरुणी तिच्या कुटुंबासह घराच्या पटांगणात झोपलेली असताना, गावातीलच ६५ वर्षीय वृद्धाने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तिच्या खाटेजवळ प्रवेश केला. त्याने झोपलेल्या तरुणीचे तोंड दाबून तिच्याशी अश्लील चाळे केले व तिचा पोशाख फाडून विनयभंग केला. तरुणीला अचानक जाग आल्याने तिने आरडाओरडा केला. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव ग्रामीण: पोलीस स्टेशन हद्दीतून २२ वर्षीय तरुणी घरात कोणालाही न सांगता शाळेची कागदपत्रे, सोन्याचे दागिने आणि ९० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन गावातीलच एका तरुणासोबत निघून गेली.
बोराखेडी: पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टाकरखेड परिसरातील १८ वर्षीय तरुणी रात्रीच्या वेळी सर्व कुटुंब छतावर झोपले होते. पाऊस आल्यामुळे सर्वजण खाली घरात झोपायला आले. पहाटे ५ वाजता बहीण खाटेवर दिसून आली नाही. परिसरात सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही.
खामगाव शहर: मूळची देऊळगाव राजा येथील असलेली आणि सध्या अमृतनगर परिसरात वास्तव्यास असलेली १८ वर्षीय तरुणी नुकत्याच लागलेल्या शैक्षणिक निकालात नापास झाल्यामुळे मानसिक तणावातून ती कोणालाही न सांगता घरातून निघून गेली आहे.
लोणार: शहरातील गौसीया नगर येथून २१ वर्षीय महिला व २ वर्षांचा मुलगा ही विवाहित महिला आपल्या २ वर्षांच्या चिमुरड्या मुलाला सोबत घेऊन अचानक घरून निघून गेली आहे. नातेवाईक आणि आसपासच्या परिसरात शोध घेऊनही त्यांचा अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही.
