अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): मलकापूर शहरात रात्रीच्या वेळी चोऱ्या करणाऱ्या एका अट्टल टोळीचा पर्दाफाश करण्यात मलकापूर शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी ३ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून विविध गुन्ह्यांमधील तब्बल ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ जून २०२६ रोजी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे व त्यांच्या पथकाला तपास करण्याचे आदेश दिले. तक्रारदाराच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, दोन अज्ञात इसम दुकानातून सामान चोरून नेताना स्पष्ट दिसले. या फुटेजच्या आधारे डी.बी. पथकाने आपल्या गोपनीय बातमीदारांना सक्रिय केले.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मलकापूर शहरातून शेख साबीर शेख अहेमद (वय ३२ वर्षे) रा. सायकलपुरा, जावेद खान मुसा खान (वय ३८ वर्षे) रा. सायकलपुरा, मो. सोहील मो. रफीक (वय २९ वर्षे) रा. पंत नगर, मलकापूर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागांतून चोरी केल्याचे समोर आले.
आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी विविध चोऱ्यांमधील हाऊस वायर किंमत १ लाख रुपये, कृषी साहित्य किंमत ५० हजार रुपये, प्लंबिंग साहित्य किंमत ६० हजर रुपये, महावितरण कंपनीचे केबल अंदाजे किंमत ६० हजार रुपये, ४ मोटरसायकली किंमत १ लाख ३० हजार रुपये, असा एकूण ३ लाख ९० हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी बजावली कामगिरी
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश गिरी, डी.बी. पथकाचे प्रमुख पोउपनि शुभम बरदाडे, पोलीस अंमलदार आसिफ शेख, संतोष कुमावत, प्रविण गवई, योगेश तायडे, गणेश बरडे, दिपक सोनोने, नवल राठोड, महिला पोलीस अंमलदार मिनल शिंदे आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी ही कामगिरी बजावली.
