अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): गेल्या दोन दिवसांत बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अपघातांच्या भीषण घटना घडल्या असून, मारहाणीच्या आणि चोरीच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. खामगाव आणि देऊळगाव राजा परिसरात झालेल्या दोन स्वतंत्र रस्ते अपघातात एका महिलेसह दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर धाड, नांदुरा आणि खामगाव शहरात किरकोळ वादातून प्राणघातक हल्ले झाले आहेत. पोलिसांनी सर्व घटनांमध्ये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.
आयशर ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार
खामगाव ग्रामीण: धुळे-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील कोलोरी शिवारात एका भरधाव आयशर ट्रक क्रमांक एमएच-१२-आरएन-८३१४ रस्ता ओलांडणाऱ्या एका ५० ते ५५ वर्षीय अज्ञात महिलेला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी चालक शहानुर मोहम्मद सय्यद (रा. लोणीकाळभोर, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सपोनि रवी मुंडे तपास करत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, चालक फरार
देऊळगाव राजा: जालना येथून टाकरखेडकडे मोटारसायकल क्रमांक एमएच-२०-एपी-२५४५ ने जात असलेला तरुण ऋषिकेश गजानन भागीले (वय २७ वर्षे) याला असोला फाट्याजवळील पेट्रोल पंपापाशी अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ऋषिकेशचा जागीच मृत्यू झाला. अपघात करून चालक वाहन घेऊन पळून गेला. पोलीस अंमलदार विश्वनाथ काकड या घटनेचा तपास करत आहेत.
भरधाव जुपिटरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
एमआयडीसी मलकापूर: नरवेलकडून मलकापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सौ. पायल शैलेश राठी (वय २६ वर्षे) यांनी आपली जुपिटर स्कुटी भरधाव चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार सौरभ दिनकर पाटील (वय २८ वर्षे) रा. धरणगाव गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतीच्या वादातून महिलेवर विळ्याने प्राणघातक हल्ला
धाड: रुईखेड मायंबा शिवारात शेतात पेरणी करत असताना जुन्या शेतीच्या वादावरून नातेवाईक गणेश देवराव उगले आणि बनाबाई उगले यांनी वंदना जगदेव उगले (वय ४५ वर्षे) यांच्यावर हल्ला केला. आरोपी गणेश उगले याने हातात असलेल्या विळ्याने वंदना यांच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले, तर दुसऱ्या आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. सफौ. शांताराम जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दारूसाठी पैसे न दिल्याने चाकूने वार
शिवाजीनगर, खामगाव: घाटपुरी नाका येथे अजय भगवान कीरकाळे हे मित्राशी बोलत उभे असताना, परिसरातीलच अनिरुद्ध भास्कर चंडाळने याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. अजय यांनी पैसे देण्यास नकार दिला असता, अनिरुद्धने शिवीगाळ करत जवळ असलेल्या चाकूने अजय यांच्या डाव्या हाताच्या बोटावर वार करून त्यांना जखमी केले.
गाईने चारा खाल्याच्या वादातून वृद्ध महिलेला काठीने झोडपले
नांदुरा: पळसोडा येथे आरोपी देवराव कुडू खांडेकर यांची गाय फिर्यादीच्या वाड्यात घुसली आणि तिने कुटार खाल्ला. या गोष्टीची समज देण्यासाठी गेल्या वृद्ध महिला मिराबाई खांडेकर यांना आरोपी देवराव आणि उखाबाई खांडेकर यांनी शिवीगाळ केली. तसेच देवरावने हातातील काठीने मिराबाईंच्या खांद्यावर व गुडघ्यावर मारून गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
घरासमोर उभी केलेली दुचाकी लंपास
मलकापूर शहर: मलकापूर शहरातील नुरमोहम्मद कॉलनी (गुरुद्वाराच्या पाठीमागे) येथे राहणारे मजूर मोहम्मद फैसल फैयाज अहमद शेख यांची २५ हजार रुपये किमतीची जुनी हिरो होंडा दुचाकी क्रमांक एमएच-२८-बीजे-९७२३ अज्ञात चोराने त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. या प्रकरणी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोउपनि सुरेश रोकडे पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी वरील सर्व घटनांमध्ये भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल केले असून, नागरिकांनी वाहने काळजीपूर्वक चालवावीत आणि कोणत्याही वादात कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले आहे.
