शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून पिढ्यानपिढ्यांचा शिव रस्ता मोकळा; पिंपरी आंधळे येथील शेतकऱ्यांचा आदर्श उपक्रम

पिंप्री आंधळे (प्रतिनिधी): शासनाच्या मदतीची वाट न पाहता पिंप्री आंधळे व आंचरवाडी येथील शेतकऱ्यांनी एकजुटीचे दर्शन घडवत लोकवर्गणीतून पिढ्यानपिढ्या रखडलेला शिव रस्ता मोकळा करून ग्रामीण भागासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमामुळे सुमारे ३० शेतकऱ्यांच्या दळणवळणाची व शेतीकामांची मोठी अडचण दूर झाली आहे.

आंचरवाडी आणि पिंप्री आंधळे या दोन्ही गावांदरम्यान असलेला शिव रस्ता अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे अडथळ्यात होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे तसेच शेतमाल घरापर्यंत किंवा बाजारपेठेत पोहोचवणे कठीण होत होते. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गावातील काही शिक्षित व जागरूक नागरिकांनी पुढाकार घेतला. त्यांनी संबंधित शेतकऱ्यांची समजूत काढून व आपसातील मतभेद दूर ठेवण्याचे आव्हान केले व सर्वांच्या सहकार्याने लोकवर्गणी जमा केली.
संकलित निधीतून जेसीबी व रोलरच्या सहाय्याने सुमारे एक किलोमीटर लांबीचा, १४ फूट रुंदीचा रस्ता तयार करण्यात आला. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन-दोन फूट रुंदीच्या नाल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यातही रस्त्याचे नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांना वर्षभर वाहतुकीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा वेळ, श्रम व खर्च वाचणार असून शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार आहे. शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ न घेता केवळ परस्पर सामंजस्य, लोकसहभाग आणि स्वखर्चातून उभारलेला हा रस्ता ग्रामीण विकासाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. महाराष्ट्रातील इतर गावांसाठीही हा उपक्रम दिशादर्शक आणि अभिमानास्पद ठरत आहे.

या उपक्रमात स्थानिक शेतकरी एकनाथ भीमराव डोईफोडे (शिक्षक), दिलीप वसंता आंधळे (तलाठी), जगदेव गणपत डोईफोडे (माजी सरपंच), गजानन देवराव डोईफोडे, गणेश सुखदेव डोईफोडे, संतोष भिमराव डोईफोडे, कांता चाटे, वैभव डोईफोडे, रामा ढाकणे, शिवा विष्णू आंधळे, तरुण कारभारी आंधळे, आत्माराम परिहार, संजय गुमलाडू, विजय गुमलाडू, कारभारी गोविंदा डोईफोडे, नारायण कारभारी डोईफोडे व दौलतराव डोईफोडे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मोलाचे योगदान दिले.
शेतकऱ्यांच्या एकोप्याने आणि सामूहिक प्रयत्नातून साकारलेला हा शिव रस्ता सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत असून, ग्रामीण भागातील विकासकामांसाठी लोकसहभाग किती प्रभावी ठरू शकतो याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!