अजय टप
बुलढाणा (हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्हा आणि परिसरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत गेल्या २४ तासांत गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये अवैध गर्भलिंग निदान करणारी बोगस डॉक्टरांची टोळी, अल्पवयीन मुलीचा बालविवाह, महावितरणच्या उच्चदाब तारांची चोरी आणि शासकीय मालमत्तेची तोडफोड अशा ६ वेगवेगळ्या गंभीर प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून तपास यंत्रणा वेगाने कार्यरत झाली आहे.
मेहकर: बेकायदेशीर सोनोग्राफी मशीनसह बोगस डॉक्टरांची टोळी गजाआड
मेहकर तालुक्यातील परतापूर येथे पोलिसांनी एका घरावर गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून बेकायदेशीर उपचार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता हिवसे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमोल रमेश रसाळ (वय ३३ वर्षे) रा. परतापूर आणि अनिल रामदास सोनुने (वय ३९ वर्षे) रा. हिंगोली यांना अटक केली. आरोपींच्या घरातून काळ्या रंगाच्या बॅगेत लपवलेली अवैध गर्भलिंग निदान करणारी सोनोग्राफी मशीन, स्टेथोस्कोप, औषधे, इंजेक्शन्स आणि सलाईन बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. आरोपींकडे कोणताही वैद्यकीय परवाना नसताना ते स्वतः डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर उपचार करत होते. सपोनी प्रदीपकुमार राठोड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
मलकापूर: १७ वर्षीय मुलीचा बालविवाह; पती व आई-वडिलांवर ‘पोक्सो’
मलकापूर शहर पोलीस हद्दीत बालविवाहाचा एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह मे २०२५ मध्ये नाशिक येथील शेख आफताफ (वय २५ वर्षे) याच्यासोबत तिच्या आई-वडिलांनी लावून दिला होता.
लग्नानंतर पीडिता गर्भवती राहिली. ती मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी व उपचारासाठी आली असता, वैद्यकीय तपासणीत तिचे वय अवघे १७ वर्षे ३ महिने असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयाच्या माहितीवरून पोलिसांनी तत्परता दाखवत पीडितेचा जबाब नोंदवला. याप्रकरणी आरोपी पती आणि मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध पोक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि सतीश बेले या प्रकरणाचा तपास करत आहेत.
धामणगाव बढे: महावितरणच्या उच्चदाब तारांची चोरी
धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी महावितरणच्या मालमत्तेवर डल्ला मारला आहे. आव्हा येनुसपुर गावाजवळून जाणाऱ्या ३३ के.व्ही. पोफळी उपकेंद्र ते सावरगाव उपकेंद्र या उच्चदाब वाहिनीवरील तारा चोरट्यांनी कापून नेल्या.
अज्ञात चोरांनी सुमारे १६४० मीटर लांबीचे (१७ स्पॅन) ३३ के.व्ही. कंडक्टर वायर** चोरून नेले, ज्याची किंमत अंदाजे १ लाख ते १ लाख १० हजार रुपये आहे. महावितरणचे प्रिन्सिपल टेक्निशियन रेवनिनाथ धडारे यांच्या फिर्यादीवरून पोहेकॉ संजय जवरे पुढील तपास करत आहेत.
मलकापुरात चोऱ्यांचे सत्र: दुचाकी आणि लाखो रुपयांचे कृषी साहित्य लंपास
मलकापुरातील बुलढाणा रोडवर असलेल्या एका गोदामातून ३ अज्ञात चोरट्यांनी १,७८,३४१ रुपये किमतीचे कृषी मशिनरी पाईपचे मेटलचे सामान (१३ आर्टिकल आणि २१ बॉक्स) चोरून नेले. नितीन बोरले यांच्या तक्रारीवरून पोउपनि शुभम बरदाडे तपास करत आहेत.
दुचाकी चोरी: घिरणी रोड येथील रुक्मिणी ले-आऊटमधून भागवत कोरडे यांची ४० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा शाईन दुचाकी क्रमांक एमएच-१९-डीयू-७६६८ अज्ञात चोरट्याने लंपास केली. पोलीस अंमलदार सुनील राऊत या प्रकरणाचा शोध घेत आहेत.
पाणी पुरवठा कार्यालयात तोडफोड; शासकीय मालमत्तेचे नुकसान
मलकापूर शहरात पाणी पुरवठा वेळेवर होत नसल्याच्या कारणावरून एका नागरिकाने थेट शासकीय कार्यालयावर रोष काढत तोडफोड केली. चांडक शाळेजवळ असलेल्या पाणी पुरवठा कार्यालयात घुसून राहुल जाधव (रा. शिवाजी नगर) या इसमाने अभियंत्यांच्या केबिनच्या काचांचे दरवाजे तोडून पळ काढला. या तोडफोडीत नगर परिषदेचे अंदाजे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वॉलमॅन मोहन हिरामण राठोड यांच्या तक्रारीवरून पोउपनि प्रशांत झेंडगे आरोपीचा शोध घेत आहेत.
