अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन अंतर्गत कौटुंबिक वाद, शेतीचे वाद आणि किरकोळ कारणांवरून हाणामारीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी संबंधित आरोपींवर नवीन भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू केला आहे.
शहरात सिमेंटच्या धुळीवरून शेजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी
शेगाव: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शेजाऱ्यांमध्ये बांधकामाच्या सिमेंट धुळीवरून वाद होऊन लोखंडी रॉडने मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फिर्यादी राजेंद्र भावजी वाघ (वय ५३ वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेजारी विजय तायडे यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने वाघ यांच्या गाडीवर सिमेंटची धूळ बसली होती. यावरून आरोपी विजय तायडे, विशाल तायडे, गोपाल तायडे आणि जयकिसन तायडे यांनी त्यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच विशाल तायडे याने लोखंडी रॉडने मारहाण करून राजेंद्र वाघ यांच्या उजव्या पायावर दुखापत केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तर दुसरीकडे विशाल विजय तायडे (वय ३५ वर्षे) यांनी उलट तक्रार दिली आहे. त्यानुसार, राजेंद्र वाघ याने सिमेंटच्या धुळीवरून वाद घालत विशालच्या आईला ढकलून खाली पाडले आणि लोखंडी रॉडने विशालच्या डाव्या हातावर मारून जखमी केले. तसेच राजेंद्र वाघ यांच्या पत्नी व मुलींनीही विशालच्या आईला चापटाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास जीपीएसआय गावंडे करत आहेत.
शेती आणि जमिनीच्या वादातून मारहाण व बेकायदेशीर अतिक्रमण
जळगाव जामोद: टाकळी पारस्कर शेत शिवारातील गट नं. ५३ मध्ये ४ एकर शेती पेरण्याच्या वादातून सख्ख्या भावांनीच भावाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. फिर्यादी धनंजय पुरुषोत्तम पारस्कर (वय ४७ वर्षे) यांना त्यांचे भाऊ संजय आणि दीपक पारस्कर यांनी अपंगत्वावरून हिणवून लाकडी दांडक्याने डोक्यात व खांद्यावर मारहाण केली. तसेच खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले व जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी बीएनएस सह अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार भागवत उबरहंडे करत आहेत.
रायपूर: रायपूर येथे शेतरस्त्याच्या कारणावरून चुलत भावांमध्ये वाद झाला. फिर्यादी सदानंद हिंमतराव भोसले (वय ५५ वर्षे) हे म्हशी चारत असताना त्यांचे चुलत भाऊ विश्वनाथ भोसले आणि पुतण्या सुहास भोसले यांनी त्यांना विनाकारण शिवीगाळ केली. सुहास याने काठीने सदानंद यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर व डोक्यात मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. तपास पोलीस अंमलदार आशिष काकडे करत आहेत.
धामणगाव बढे: आव्हा शिवारात शेतीच्या मालकी हक्कावरून अतिक्रमण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी डॉ. सुबोध विकास पाटील (वय ३८ वर्षे) यांच्या पूर्वपरवानगीशिवाय आणि कोणताही मालकी हक्क नसताना आरोपी दिनकर तुकाराम मानकर (रा. खडदगाव) याने आव्हा शिवारातील शेत गट नं. १३६ मध्ये बेकायदेशीरपणे पेरणी केली. तपास पोलीस अंमलदार संजय जवरे करत आहेत.
किरकोळ कारणांवरून मारहाण
खामगाव शहर: चांदमारी फैल परिसरातील फिर्यादी शेख अजीम शेख कलीम (वय २२ वर्षे) याने आपल्या आत्याला घराचे कुलूप का तोडले असे विचारले असता, रस्त्यावरील आरोपी शेख हनीफ शेख फरीद याने “तू तुझ्या आत्याला का बोलतो?” असे म्हणत रस्त्यावरील दगड उचलून शेख अजीमच्या डाव्या हिरडीवर मारून जखमी केले व सार्वजनिक शांततेचा भंग केला. तपास पोलीस अंमलदार विठ्ठल चव्हाण करत आहेत.
धाड: कुंबेफळ शिवार येथे जेवणाच्या कारणावरून नातेवाईकांमध्ये वाद झाला. आरोपी शंकर तात्याराव शितोळे याने फिर्यादी अनुसया बाप्पू शेगर (वय ५८ वर्षे) यांच्या डोक्यात काठी मारून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस अंमलदार सुनील सोनुणे हे करत आहेत.
धामणगाव बढे: सावरगाव जहांगीर येथील आरोपी साईराज संजय पालवे याने फिर्यादी प्रवीण रवींद्र पालवे (वय ४५ वर्षे) यांच्या मुलाच्या डाव्या पायाच्या घोट्यावर विनाकारण दगड मारून जखमी केले, तसेच पालवे पती-पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. तपास पोलीस अंमलदार संजय जवरे करत आहेत.
तामगाव: रिंगणवाडी येथे आरोपी जानराव महादेव नांदणे याने दारूच्या नशेत फिर्यादी सदानंद दिगंबर गव्हांदे (वय ४२ वर्षे) यांच्या घरासमोर जाऊन त्यांना व त्यांच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तामगाव पोलिसांनी याप्रकरणी जातीय एनसी दाखल केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार उमेश बोरसे हे करत आहेत.
