संत मुक्ताबाईंची पालखी मलकापुरात दाखल; आनंद व भक्तिमय वातावरणात जल्लोषपूर्ण स्वागत

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो) : आदिशक्ती संत मुक्ताबाईंची पवित्र पालखी मलकापूर नगरीत दाखल होताच संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “संत मुक्ताबाई की जय”च्या जयघोषात हजारो भाविकांनी पालखीचे उत्स्फूर्त व भक्तिभावाने स्वागत केले. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, आकर्षक रांगोळ्या, भगवे ध्वज आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखीचे स्वागत करण्यात आल्याने संपूर्ण शहरात उत्सवाचे आणि भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले.

शहरातील विविध सामाजिक, धार्मिक संस्था, व्यापारी, महिला मंडळे, युवक मंडळे तसेच वारकरी संप्रदायातील भाविकांनी पालखी मार्गावर स्वागतासाठी भव्य तयारी केली होती. अनेक ठिकाणी फुलांच्या वर्षावाने पालखीचे स्वागत करण्यात आले, तर महिलांनी पारंपरिक पद्धतीने रांगोळ्या काढून आणि औक्षण करून संत मुक्ताबाईंच्या पालखीप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.

पालखीच्या आगमनानिमित्त शहरातील प्रमुख मार्ग भगव्या पताका, स्वागत कमानी आणि आकर्षक सजावटीने उजळून निघाले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने पालखीचे दर्शन घेत संत मुक्ताबाईंच्या चरणी प्रार्थना अर्पण केली. वारकऱ्यांच्या अभंग, टाळ-मृदंगाच्या गजराने आणि हरिनाम संकीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाले.

आज मलकापूर येथे पालखीचा मुक्काम असून वारकरी व भाविकांसाठी भोजन, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा आणि इतर आवश्यक सुविधांची उत्तम व्यवस्था आयोजन समिती व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. आयोजन समितीच्या माहितीनुसार, संत मुक्ताबाईंची पालखी शनिवारी दि. २७ जून रोजी सकाळी मलकापूर येथून पुढील प्रवासासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी मलकापूरकरांनी दाखविलेला उत्साह, भक्तीभाव आणि सेवाभाव हा वारकरी परंपरेचा जिवंत वारसा असल्याचे भाविकांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!