बुलढाणा जिल्हा गुन्हेगारी वृत्त: मारहाण, चोरी, एटीएम फसवणूक आणि दोन तरुणी बेपत्ता; विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यातील जलंब, नांदुरा, मलकापूर शहर आणि धाड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या दोन ते तीन दिवसांत विविध गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये शेतीच्या वादातून मारहाण, धावत्या ट्रॅव्हल्सचा अपघात, घरफोडी, लाखो रुपयांची केबल चोरी, एटीएम कार्ड बदलून झालेली फसवणूक आणि दोन मुली बेपत्ता झाल्याच्या घटनांचा समावेश आहे.

जलंब: लांजुड येथील गट क्र. ३१९ मधील शेतात फिर्यादी मोहन पाडसिंग लाहुडकर (वय ४३ वर्षे) रा. चिखली खुर्द हे पेरणी करत असताना, आरोपींनी संगनमत करून त्यांना अडवले. आरोपी वैभव पुरोषतम लाहुडकर याने लोखंडी अवजाराने फिर्यादीचा भाचा महेश रविंद्र वफ्टे (वय २४ वर्षे) याच्या डोक्यावर डाव्या कानाच्या वर मारून गंभीर जखमी केले. तसेच आरोपी श्रीमती संगिता लाहुडकर हिने विनयभंगाच्या खोट्या तक्रारीत अडकवण्याची धमकी दिली. या प्रकरणी ६ नामजद व ४ अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमे १८९(२), १९१(२), १९१(३), ११८(१), ११५(२), ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार सचिन बावणे करत आहेत.

नांदुरा: अवधा शिवारातील शेतात ट्रॅक्टरने रोटर करत असताना जुन्या वादावरून नातेवाईक आरोपी राजाराम साहेबेराव गावंडे व अविनाश राजाराम गावंडे यांनी फिर्यादी शंकर साहेबराव गावंडे (वय ५७ वर्षे) यांना लाथाबुक्क्यांनी छातीवर व पाठीवर मारहाण केली. आरोपी अविनाशने हातातील दगड मारून फिर्यादीच्या डाव्या पायाचे बोट सुजवले व ट्रॅक्टर चालकाला कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी दिली. नांदुरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सफौ गजानन इंगळे करत आहेत.

मलकापूर शहर: गोरक्षण जवळील गोडावूनमधून अज्ञात चोराने केबलचे एकूण ६२ बंडल, ज्यांची एकूण किंमत २ लाख ७६ हजार ५०० रुपये आहे, चोरून नेले. व्यापारी महावीर बिंजराज बुरड यांच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि प्रशांत झेंडगे हे करत आहेत.

मलकापूर शहर: ग्रामसेवक अर्चना रामराव माहुरे (वय ३० वर्षे) रा. रामवाडी, मलकापूर या एसबीआय बँक एटीएम (मुख्य शाखा) मधून पैसे काढण्यासाठी गेल्या असता, दोन अनोळखी भामट्यांनी “तुमचे ट्रान्झॅक्शन पूर्ण झाले नाही” असे सांगून हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणांहून त्यांच्या खात्यातून ७० हजार रुपये काढून फसवणूक केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि प्रशांत झेंडगे हे करत आहेत.

नांदुरा: गणपती नगर, नांदुरा येथील रहिवासी जीवन नथुराम कदम हे बाहेरगावी गेले असता अज्ञात चोराने घराचे कुलूप व कडी-कोंडा तोडून कपाटातील ७ हजार रुपये रोख आणि १ तोळ्याचे चांदीचे पैंजन (किंमत १ हजार रुपये), असा एकूण ८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार संदीप डाबेराव हे करत आहेत.

नांदुरा: नांदुरा बायपास खातखेड फाट्याजवळ ट्रक क्रमांक जीजे-१२-बीझेड-७७३६ च्या चालकाने रस्त्याच्या मधोमध कोणतेही इंडिकेटर किंवा बॅरिकेड न लावता वाहन धोकादायकरित्या उभे केले होते. खामगावकडून मलकापूरकडे जाणाऱ्या डीएनआर ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच-३४-बीएच-६०७७ च्या चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता, ट्रॅव्हल्स डाव्या बाजूच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली. यात प्रवासी जखमी झाले असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रॅव्हल्स चालक सुखनंदन प्रजापती यांच्या रिपोर्टवरून ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५, १२५(अ)(ब), ३२४(५) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस अंमलदार सय्यद करत आहेत.

धाड: सावळी (ता. जि. बुलढाणा) येथील रहिवासी असलेली १८ वर्षे २ महिने वयाची तरुणी २९ जून रोजी सकाळी “मी सिल्लोड येथे कॉलेजच्या ॲडमिशनसाठी जात आहे” असे वडिलांना फोनवर सांगून घराबाहेर पडली, ती अद्याप परतलेली नाही. तिचा मोबाईलही बंद येत आहे. धाड पोलिसांत वडिलांच्या तक्रारीवरून मिसींग दाखल करण्यात आली असून पुढील तपास सफौ जाधव करत आहेत.

नांदुरा: निमगाव (ता. नांदुरा) येथील रहिवासी असलेली २० वर्षीय तरुणी ३० जून रोजी रात्री ९ वाजता वडिलांना जेवण वाढून दिल्यानंतर कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. नातेवाईकांकडे, बसस्टँड व रेल्वे स्टेशनवर शोध घेऊनही ती मिळून आली नाही. याप्रकरणी कुटुंबियांच्या तक्रारीवरून मिसींग दाखल करण्यात आली असून पुढील तपास सफौ इंगळे हे करत आहेत.

मलकापूर शहर: संत ज्ञानेश्वर नगर, सातव प्लॉट, मलकापूर येथील रहिवासी सुनील गोविंदा जाधव (वय ३७ वर्षे) यांनी राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुतण्या सागर रमेश जाधव यांच्या तोंडी रिपोर्टवरून मलकापूर शहर पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला असून प्राथमिक तपास एएसआय संजय निंबोळकर करत आहेत. मृतकाच्या मृत्यूबाबत कोणावरही संशय नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!