अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गंभीर अपघात, हाणामारी, फसवणूक आणि अनेक व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या सर्व प्रकरणांची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मलकापूर: शहरात भीषण हिट अँड रन; एकाचा मृत्यू, बैलगाडी चालकाचा पाय तुटला: मलकापूर ग्रामीण रोडवर एका भरधाव बोलेरो पिकअप क्रमांक एमएच-२८-बीबी-९३४१ च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात गजानन बबुरव जवरे यांचा मृत्यू झाला. अपघात करून पळून जाणाऱ्या याच चालकाने पुढे जांभूळधाबा गावाजवळ एका बैलगाडीलाही धडक दिली. यामध्ये बैलगाडी चालक धनराज बावस्कर यांचा डावा पाय गुडघ्यापासून तुटला असून साहेबराव बावीस्कर हे जखमी झाले आहेत, तसेच एक बैलही जागीच ठार झाला आहे. चालक शुभम राणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदुरा: येथील रहिवासी ज्ञानेश्वर श्रीकृष्ण आढाव (वय ४३ वर्षे) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांना मृत अवस्थेत मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मलकापूर शहर पोलिसात या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला आहे.
खामगाव: येथील एका पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीचा साखरपुडा १ नोव्हेंबर २०२५ रोजी शेगाव रोडवरील हॉटेल द्वारकाधीश येथे अकोला येथील कपिल सिद्धार्थ धांडे याच्याशी झाला होता. मात्र, त्यानंतर अवघ्या १० दिवसांत आरोपींनी हुंड्याची मागणी केली आणि लग्न मोडले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने अकोला आणि खामगाव येथील ६ आरोपींविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धामणगाव बढे: पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चावरदा (ता. मोताळा) येथे पूर्ववैमनस्यातून ५ जणांच्या टोळीने हातात काठ्या व लोखंडी वस्तू घेऊन एका घरात बेकायदेशीर प्रवेश केला. आरोपींनी फिर्यादी गुंफाबाई खराटे (वय ६३ वर्षे) आणि त्यांच्या मुलाला “तुला खल्लास करून टाकतो” अशी धमकी देत काठ्यांनी व लोखंडी वस्तूने मारहाण करून गंभीर जखमी केले. धामणगाव बढे पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
धाड: पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या डोमरुळ शिवारात शेतात रोटाव्हेटर सुरू असताना आरोपींनी ट्रॅक्टर अडवून चालकाला हटकले. त्यानंतर शेतात काम करणाऱ्या महिला फिर्यादी चंद्रकला पडोळ यांना अश्लील शिवीगाळ करत लोटपाट केली आणि “पुन्हा शेतात आली तर उभ्याने चिरून टाकीन” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. धाड पोलीस ठाण्यात ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मलकापुर: येथे सालीपुरा भागात लहान मुलांच्या खेळण्यातील ढकलाढकलीच्या कारणावरून दोन महिला आरोपींनी एका १२ वर्षीय मुलीला निंबाच्या काठीने पाठीवर, हातावर व पायावर बेदम मारहाण केली. तसेच कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मलकापूर शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी तरुण-तरुणी आणि व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या एकूण ६ घटना समोर आल्या आहेत.
बोराखेडी: कोथळी येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. ती रात्रीच्या सुमारास घरातील मोबाईल, कपडे आणि ३० हजार रुपये रोख घेऊन निघून गेली आहे. बोराखेडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मलकापूर: विटाळी येथील एक १९ वर्षीय तरुणी (बी.एस्सी. द्वितीय वर्ष) कॉलेजला जाते असे सांगून घरून निघून गेली ती परतलीच नाही. मलकापूर ग्रामीण पोलिसात मिसिंग दाखल आहे.
मलकापूर: संत ज्ञानेश्वर नगर येथील एक ३९ वर्षीय गृहस्थ “अर्ध्या तासात परत येतो” असे सांगून आणि आपला फोन घरीच ठेवून निघून गेले. ते अद्याप घरी किंवा कामाच्या ठिकाणी पोहोचलेले नाहीत.
जलंब: येथील एक १८ वर्षीय तरुणी आई-वडील शेतात गेले असताना घरून कोणालाही न सांगता निघून गेली आहे. जलंब पोलिसात तपास सुरू आहे.
तामगाव: एकलारा येथील एक २२ वर्षीय तरुणी रात्रीच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाली. नातेवाईकांनी शोध घेऊनही ती मिळून आली नाही.
रायपुर: साखळी खुर्द येथील एक १८ वर्षीय तरुणी पहाटेच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची नोंद रायपुर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार या सर्व प्रकरणांचा पुढील तपास करत आहेत.
