अजय टप
मलकापुर, (हिंदवार्ता न्यूज ब्युरो): तालुक्यातील दुधलगाव परिसरात अज्ञात आरोपींनी एका दाम्पत्याच्या घरात घुसून चाकू व विळ्याचा धाक दाखवत लुटमार केली. त्यानंतर पतीला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेला शेतात नेऊन दोघांनी आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. १७ जुलैच्या रात्री घडलेल्या या घटनेत मलकापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधार्थ पाच पथके रवाना करण्यात आली आहे.
पीडिता ही आपल्या पतीसोबत दुधलगाव येथील शेतातील घरात झोपलेली असताना रात्री ११ च्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला. आरोपींपैकी एकाच्या हातात चाकू तर दुसऱ्याच्या हातात विळा होता. दोघांनी दाम्पत्याला शस्त्रांचा धाक दाखवत पतीजवळील मोबाइल आणि ६०० रुपये रोख जबरदस्तीने हिसकावून घेतले. यानंतर सोन्या-चांदीचे दागिने मागितले. दागिने नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी दाम्पत्याला जबरदस्तीने जवळील शेतात नेले. तेथे पतीला विळ्याचा धाक दाखवून विवाहितेवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर आरोपी पसार झाले. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, सहाय्यक पोलीस अधीक्षक जगताप, ठसे तज्ज्ञ, श्वान पथक, फॉरेंन्सिक पथक असून जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा, मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशन या तिन्ही पोलीस स्टेशनचे वेगवेगळे पाच पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश महल्ले हे करीत आहेत.
