अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): महसूल विभागाच्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला करून रेतीची वाहने पळवून नेणाऱ्या आणि तब्बल दोन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या एका अट्टल फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. धम्मपाल मच्छिंद्र अंभोरे (वय २४ वर्ष, रा. दिग्रस बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सन २०२४ मध्ये किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत रेतीच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर आरोपींनी रेतीची वाहने जबरदस्तीने पळवून नेली होती. याप्रकरणी किनगाव राजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी धम्मपाल अंभोरे हा २०२४ पासून सतत फरार होता आणि पोलीस त्याच्या शोधात होते.
दरम्यान, १८ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी दिग्रस बुद्रुक परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने पाठलाग करून त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी किनगाव राजा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश सावळे, पोलीस अंमलदार दिगंबर कपाटे आणि महिला पोलीस अंमलदार वनिता शिंगणे यांनी सदर कामगिरी बजावली.
