अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):मलकापूरपासून जवळच असलेल्या दुधलगाव बुद्रुक येथील शेतशिवारात एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना उघडकीस आली आहे. शेतात राहून मजुरी करणाऱ्या एका १९ वर्षीय विवाहित महिलेवर दोन अज्ञात नराधमांनी कोयता आणि विळ्याचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दुधलगाव बुद्रुक येथील संजय भारंबे यांच्या लोणवडी शिवारातील शेतात मध्यप्रदेशातील एक आदिवासी ‘पावरा’ कुटुंब शेतमजुरीसाठी वास्तव्यास आहे. १७ जुलैच्या रात्री १२.३० वाजताच्या सुमारास १९ वर्षीय पीडित महिला तिच्या पतीसह झोपडीत मोबाईल पाहत झोपलेली होती. त्याच वेळी दोन अज्ञात इसमांनी झोपडीत बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यांनी पती-पत्नीला कोयता आणि विळ्यासारख्या धारदार शस्त्रांचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. मात्र, गरीब मजूर कुटुंबाकडे पैसे नसल्याने संतप्त झालेल्या अज्ञात आरोपींनी पीडित महिलेला जबरदस्तीने झोपडीच्या बाजूला ओढत नेले आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली. अप्पर पोलीस अधीक्षक, खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी तातडीने पावले उचलत १९ वर्षीय पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
पीडित महिलेने दिलेल्या तोंडी जबाबाच्या आधारे मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ६४(१), ७०(१), ३०९(४), ३११, ३३३, ३५१(२), (३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश महल्ले करीत असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
