बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये पोलिसांनी २ आरोपींना रंगेहात पकडले असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी नगदी रकमेसह वरली-मटका साहित्य जप्त केले आहे. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
रायपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध जुगार सुरू असल्याची माहिती बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार दिगंबर कपाटे, अनंता फरतळे आणि गणेश वाघ यांनी १९ जुलै रोजी विविध ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी आरोपी पंकज अनिल पांडे (वय २५ वर्षे) रा. पिंपळगाव सराई आणि साहेबराव भीमराव सरकटे (वय ५५ वर्षे), रा. सैलानी हा पैशाच्या हारजीतवर वरली-मटका जुगार खेळतांना आणि खेळवितांना रंगेहात मिळून आला. या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी आरोपींकडून जुगाराचे साहित्य आणि नगदी रक्कम, असा एकूण ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी रायपूर पोलिसांत महाराष्ट्र जुगार कायद्याचे कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रायपूर पोलीस करीत आहेत. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार चालकांचे धाबे दणाणले आहेत.
