बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): माहेरून ५ लाख रुपये रोख आणि फ्लॅट आणण्यासाठी एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांत पतीसह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने ‘भरोसा सेल’ येथे दिलेल्या तक्रार अर्जावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
बुलढाणा शहरातील इंदिरा नगर येथील रहिवासी फतिमा हलीमा सादीया (उर्फ गुडुना) यांचा विवाह शाहीन शहा याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे ३ ते ४ महिने सासरच्या मंडळींनी त्यांना चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर सासू हलिमा बी शहा आणि सासरे बशीर शहा यांनी घरगुती कामात चुका काढून टोमणे मारणे व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दीर शेहजाद शहा, चुलत सासरे अन्वर शहा व मुनीर शहा हे सतत पती शाहीन शहा याला फिर्यादीविरुद्ध भडकावत असत. फिर्यादीच्या वडिलांचे देऊळगाव राजा येथे फ्लॅट्स आहेत. त्यातील एक फ्लॅट नावावर करून देणे आणि मुलाच्या व्यवसायासाठी माहेरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी आरोपींनी लावून धरली होती. पती शाहीन शहा याने इतर नातेवाईकांच्या चिथावणीवरून वारंवार पैसे व फ्लॅटची मागणी करत फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. मागणी पूर्ण न केल्यास विवाहिता व तिच्या नातेवाईकांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. तसेच, पतीने विवाहितेच्या भावाला फोन करून तुमच्या बहिणीला घेऊन जा, असे सांगितले. छळाला कंटाळून अखेर विवाहितेने भरोसा सेलकडे दाद मागितली होती. दरम्यान, भरोसा सेलच्या पत्रावरून बुलढाणा शहर पोलिसांत आरोपी पती शाहीन शहा बशीर शहा, सासरा बशीर शहा लुकमान शहा, सासू हलीमाबी बशीर शहा, दीर शेहजाद शहा बशीर शहा, चुलत सासरे अन्वर शहा लुकमान शहा, मुनीर शहा याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार दत्तात्रय नागरे हे करत आहेत.
