अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):बनावट नोटांचा व्यवहार करण्याचे आमिष दाखवून एका ५० वर्षीय शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवत लुटल्याची खळबळजनक घटना मलकापूर येथील कुंड फाट्यावर घडली आहे. २६ जुलै रोजी सायंकाळी घडलेल्या या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी सात जणांसह एका अनोळखी व्यक्तीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड सोनेवाडी येथील रहिवासी सुभाष माणिकराव गावंडे (वय ५० वर्षे) यांना आरोपींनी मोबाईलवर संपर्क साधून कुंड फाट्यावरील ‘हॉटेल जयभोले’समोर बोलावले होते.
गावंडे हे त्यांच्या स्विफ्ट कार क्रमांक एमएच-३०-एझेड-०७१६ मध्ये आरोपींची वाट पाहत असताना दोन मोटारसायकलवरून पाच जण तेथे आले. आरोपींनी १ लाख रुपयांचा व्यवहार करण्याचे सांगत नोटांचे बंडल दाखवले. मात्र, या नोटा बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर गावंडे यांनी व्यवहारास ठाम नकार दिला.
याचा राग आल्याने आरोपींनी त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली आणि धारदार चाकूचा धाक दाखवून खिशातील ५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला.
या प्रकरणी मलकापूर पोलिसांनी आरोपी मयुर सुनिल खानझोडे (वय १९, रा. कुर्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर), अभिशेक भिमराव इंगळे (वय २०, रा. कुर्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर), अमर सोनोने (रा. कुर्हा काकोडा), सुपेश पाटील (रा. कुर्हा काकोडा), गोलू भिसे (रा. कुर्हा काकोडा), विश्वा (रा. बहापूरा, ता. मलकापूर) यांच्यासह अन्य दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या ताब्यातून भारतीय बच्चो का बँक, असा मजकूर लिहिलेल्या ५०० रुपयांच्या २००० बनावट नोटा, लुटलेली ५ हजार रुपयांची रोकड, एक धारदार चाकू, एक स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, विविध कंपन्यांचे ४ अँड्रॉइड मोबाईल, असा एकूण २ लाख ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश बेले हे करीत आहेत.
