अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):मलकापूर शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या २४ ते ४८ तासांत विविध घटना समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारे आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी एकावर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच म्हाडा कॉलनी परिसरात एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर व पतीवर दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. गुरुद्वारा परिसरात अवैध हातभट्टी दारूवर छापा टाकून एकास अटक करण्यात आली आहे, तर दुसरीकडे स्वामी समर्थ यांच्या बैठकीसाठी घरातून निघालेली ३७ वर्षीय महिला रहस्यमयरित्या बेपत्ता झाली आहे. या सर्व घटनांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाने सर्व प्रकरणांत कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे.
३७ वर्षीय महिला बेपत्ता
मलकापूर: मलकापूर शहरातील गणेश नगर भागातील एक ३७ वर्षीय महिला घरातून अध्यात्मिक बैठकीला जात असल्याचे सांगून बाहेर पडली; मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नसल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत मिसींगची नोंद करण्यात आली आहे.
गणेश नगर, मलकापूर येथील रहिवासी असलेली ३७ वर्षीय महिला या २८ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.४५ वाजता आनंद सोसायटी, मलकापूर येथे होणाऱ्या स्वामी समर्थ यांच्या बैठकीसाठी जाते, असे घरात सांगून निघाल्या होत्या. दिवस उलटून गेल्यानंतरही त्या घरी न परतल्याने कुटुंबाने त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, ओळखीचे लोक तसेच आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही रुपाली यांचा कोणताही सुगावा लागला नाही. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार अमोल शेले करीत आहेत.
समर्थ योगीराज गोविंद महाराजांचे फोटो एडिट करून भावना दुखावल्या
मलकापूर: सोशल मीडियाचा गैरवापर करून धार्मीक भावना दुखावणारे आणि पूजनीय व्यक्तींचे विकृत फोटो प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. श्री समर्थ योगीराज गोविंद महाराज माखनेर यांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर एडिट करून टाकल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धानोरा (ता. नांदुरा) येथील रहिवासी सौ. योगीता संदीप गावंडे (वय ३४ वर्ष, व्यवसाय – घरकाम) यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, अमरावती येथील रहिवासी आरोपी घनशाम राजेंद्र ढोले (रा. अनंतवाडी, बडनेर रोड, अमरावती) याने त्याच्या व्हॉट्सॲप (WhatsApp), फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर श्री समर्थ योगीराज गोविंद महाराज माखनेर यांचे आक्षेपार्ह व विकृत फोटो एडिट करून स्वतःचा फोटो लावला. हे फोटो आक्षेपार्ह हेतूने आणि दुष्ट उद्देशाने सोशल मीडियावर प्रसारित करून फिर्यादी तसेच समस्त भाविकांच्या श्रद्धास्थानाचा घोर अपमान केला असून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ही बाब फिर्यादी यांच्या पतीने त्यांना दाखवल्यानंतर त्यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड हे करीत आहेत.
म्हाडा कॉलनीत पती-पत्नीस बेदम मारहाण
मलकापूर: घरगुती व किरकोळ वादातून म्हाडा कॉलनी परिसरात एका महिलेच्या घरात बेकायदेशीरपणे घुसून तिच्यावर आणि तिच्या पतीवर लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली.
म्हाडा कॉलनी मलकापूर येथील रहिवासी बेबी भगवान बगाडे (वय ५२ वर्षे) या २६ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घरात काम करत होत्या. त्यावेळी म्हाडा कॉलनीतीलच रहिवासी आरोपी संजय भगवान गवई हा अचानक त्यांच्या घरात घुसला.
आरोपीने घरात शिरताच फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपीने स्वतःच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादी सौ. बेबी बगाडे यांच्या डोक्यावर सपासप वार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला, तसेच उजव्या हाताच्या मनगटावर मार लागल्याने मुका मार बसला. यावेळी फिर्यादीचे पती सोडवासोडव करण्यासाठी आले असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून उपरोक्त आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय निंबाळकर हे करीत आहेत.
१२ लिटर हातभट्टी दारूसह आरोपी गजाआड
मलकापूर: मलकापूर शहर पोलिसांनी अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी छुप्या रीतीने विक्रीसाठी आणलेली हातभट्टीची दारू जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मलकापूर शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे २७ रोजी पोलिसांनी फुकटपुरा रोडवरील गुरुद्वाराजवळ सार्वजनिक ठिकाणी सापळा रचून प्रोव्हिशन रेड केली. या रेडदरम्यान पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपी लक्ष्मण रामा सोनोने (वय ५० वर्षे), रा. विष्णू नगर, फुकटपुरा, मलकापूर याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील १५ लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनची पंचांसमक्ष पाहणी केली असता, त्यात आंबट व उग्र वासाची १२ लिटर हातभट्टीची दारू (प्रति लिटर १००/- रुपये प्रमाणे एकूण किंमत १,२००/- रुपये) मिळून आली. या प्रकरणी पोलीस अंमलदार संतोष कुमावत यांच्या फिर्यादीवरून मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
