अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो) : तालुक्यातील वाघुड गाव शिवारातील मुंबई–नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका ठिकाणी अनधिकृतपणे डिझेलचा साठा केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी कारवाई करत सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अत्यावश्यक वस्तू अधिनियमासह संबंधित पेट्रोलियम नियंत्रण आदेशांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यस्तरीय दक्षता पथक प्रमुख तथा नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांच्या आदेशानुसार पुरवठा निरीक्षक धनवर्षा श्रीकृष्ण हरणे यांनी पंचांसमक्ष वाघुड शिवारातील श्री विश्वकर्मा वेल्डिंग वर्क्सजवळ छापा टाकला. या कारवाईदरम्यान दोन नोजल असलेले डिस्पेन्सिंग युनिट, ५० किलोलिटर क्षमतेच्या दोन भूमिगत लोखंडी टाक्या, १० किलोलिटर क्षमतेची एक भूमिगत टाकी तसेच सुमारे ४ हजार लिटर डिझेलसदृश द्रव पदार्थ असा एकूण अंदाजे ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी गणेश पुरुषोत्तम क्षीरसागर (वय ३८, रा. वाघुड, ता. मलकापूर) याच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ तसेच मोटार स्पिरीट व हायस्पीड डिझेल (पुरवठा, वितरण व गैरप्रकार प्रतिबंध) आदेश, १९९८ मधील संबंधित तरतुदींनुसार मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पंचांसमक्ष सुपूर्दनाम्यावर आरोपीच्या ताब्यात देण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश वेले करीत आहेत.
