धाड,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि भरधाव वेगाने वाहने चालवून अपघातांना निमंत्रण देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध धाड पोलिसांनी मोहीम उघडली आहे. जुलै महिन्यामध्ये धाड पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल १३५ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून, त्यांच्याकडून ७५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात धाड ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या नेतृत्वात वाहतूक पोलीस अंमलदार कुमोद जाधव व देवेंद्र मुळे यांनी रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जुलै महिन्यात विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करणे व वाहन अयोग्य पद्धतीने उभे करणाऱ्या सर्वाधिक ६१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तर पोलिसांच्या हातवाऱ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या २३ जणांवर, वाहन चालविण्याचा वैध परवाना नसलेल्या १७ चालकांवर, चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्या १४ जणांवर, मद्यप्राशन करून जीवघेणा प्रवास करणाऱ्या ६ जणांवर, ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या पाच, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्या तीन, सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या तीन, नंबर प्लेट नसलेले वाहन चालवणाऱ्या दोन आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सातत्याने सुरू राहील, असा स्पष्ट इशारा ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी दिला आहे.
नियमांचे पालन करा
प्रवासादरम्यान वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वाहनांची सर्व कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावीत, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, तसेच दुचाकीस्वारांनी हेल्मेट व चारचाकी चालकांनी सीट बेल्टचा वापर अनिवार्यपणे करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
