दुध्याच्या मर्दडी देवी मंदिरात धाडसी घरफोडी!; पावणे तीन लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास; चोरट्यांचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

धाड,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दुधा येथील प्रसिद्ध मर्दडी देवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी घरफोडी करून देवीच्या अंगावरील तब्बल २ लाख ७७ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तोंडावर रुमाल आणि हातात हँडग्लोव्हज घालून आलेल्या शातीर चोरट्यांनी ही चोरी केली असून, त्यांचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मंदिराचे पुजारी विलास पांडुरंग दांडगे (वय ४३ वर्षे) हे ४ ऑगस्ट रोजी रात्री मंदिराच्या गाभाऱ्याला कुलूप लावून घरी गेले होते. दरम्यान, ४ ऑगस्टच्या रात्री ९.३० ते ५ ऑगस्टच्या सकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या पश्चिम बाजूच्या ग्रील गेटचे कुलूप तोडले. त्यानंतर आत घुसून मुख्य गाभाऱ्याच्या ग्रील गेटचेही कुलूप तोडून थेट देवीचा एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट (किंमत २० हजार रुपये), ७५० ग्रॅम वजनाचा चांदीचा नाग (किंमत १० हजार रुपये), ५०० ग्राम वजनाच्या चांदीच्या पादुका ( किंमत ७२ हजार रुपये), २५ ग्राम वजनाच्या देवीच्या गळ्यातील मंगळसूत्रातील ४ सोन्याचे पोत ( किंमत १ लाख ७५ हजार), असा ऐकून २ लाख ७७ हजार रुपयांचा (आजच्या बाजार भावानुसार सहा ते सात लाख रुपयांचा) ऐवज चोरून पोबारा केला. ५ ऑगस्टच्या सकाळी मंदिर उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला.

घटनेची माहिती मिळताच धाड ठाणेदार आजिनाथ मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व तपासाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी पंचनामा करून मंदिरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुजारी विलास पांडुरंग दांडगे यांच्या फिर्यादीवरून धाड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३०५ व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार आजिनाथ मोरे यांच्यासह त्यांचे सहकारी करत आहेत. मंदिरात झालेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, चोरट्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.

दुचाकीवरून पळ काढला

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, चोरट्यांनी हातात हँडग्लोव्हज आणि चेहऱ्यावर रुमाल बांधला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी सोन्या-चांदीचा ऐवज घेऊन दुचाकीवरून थेट बुलढाण्याच्या दिशेने पळ काढला. धाड पोलिसांनी तपासाची सुत्रे वेगाने हलवत बुलढाणा ते फर्दापूरपर्यंत चोरट्यांचा मागोवा घेण्यात यश मिळवले असून, चोरटे लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!